मुंबई : 'कौन बनेगा करोडपती'चे प्रोमो आले. प्रश्न आले. पण अजून चित्रीकरणाला सुरुवात झालेली नाही. लॉकडाऊनमुळे या सगळ्या प्रोसेसला उशीरच झाला आहे. पण त्याला आता आणखी उशीर होणार आहे. कारण बिग बी अमिताभ बच्चन यांना चित्रीकरण करता येणारं नाही. म्हणजे, त्यांची तयारी असेलही चित्रीकरण करण्याची. पण कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शासनाची ज्येष्ठ कलाकारांना सेटवर येऊ देण्याची तयारी नसल्याचं दिसतं. अर्थात केंद्राने घालून दिलेले नियम हेच सांगतात. निर्मात्यांच्या संस्थेने, चित्रपट महामंडळाने ज्येष्ठ कलाकारांना सेटवर येऊ देण्याची परवानगी मागितली होती. पण नव्या अध्यादेशातही या कलाकारांना घरीच थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


मनोरंजनसृष्टीत आता चित्रीकरण व्हायला सुरुवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शासनाने नवा अध्यादेश काढला आहे. त्यात काही नव्या सुधारित अटी-शर्तींचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार चित्रीकरणाच्या सेटवर रुग्णवाहिका, डॉक्टर, नर्स नसले तरी चालणार आहे. पण त्याचवेळी सेटवर रुग्णाला नजीकच्या रुग्णालयात घेऊन जाणारी एक गाडी तयार असणं अत्यावश्यक आहे. शिवाय त्या गाडीत प्रथमोपचार करण्याच्या सुविधा असणं बंधनकारक असणार आहे. तर 65 वर्षावरच्या कलाकारांना मात्र सेटवर येण्यास मज्जाव असणार आहे.


लॉकडाऊन लागण्याला सुरुवात झाली ती मनोरंजनसृष्टीपासून. आधी थिएटर बंद झाली. त्यानंतर चित्रीकरणे बंद झाली. त्यालाही आता तीन महिने उलटले. लॉकडाऊन उठू लागले तेव्हा सगळ्यात शेवटी मनोरंजनसृष्टी असेल असा कयास वर्तवला जात होता. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तो खोटा ठरवत, मनोरंजनसृष्टीतल्या विविध मान्यवरांशी चर्चा करुन चित्रीकरणाला सशर्त परवानगी दिली. त्यात काही अटींवर निर्मात्यांच्या संघटनेने अडचणी असल्याचं सांगत त्या बदलण्याची विनंती शासनाला केली होती. त्यात प्रत्येक सेटवर डॉक्टर, नर्स आणि रुग्णवाहिका ठेवणं अशक्य असल्याचं मत नोंदवण्यात आलं होतं. मुंबई आणि सर्वत्र डॉक्टर, नर्सची कमतरता असताना सेटवर अशी सोय करणं उचित नसल्याचं मत नोंदवण्यात आलं. याचा विचार करुन ही अट बदलण्यात आली आहे. तिथे आता एक गाडी तयार असणं आवश्यक असणार आहे. शिवाय, 65 वर्षावरील कलाकारांना सेटवर यायला परवानगी मिळावी अशीही विनंती करण्यात आली होती. निर्मात्यांच्या असोसिएशनसह अखिल भारतीय चित्रपट महामंडळानेही ही मागणी केली होती. परंतु, वयाबाबत केंद्राकडूनच मार्गदर्शत तत्वे आल्याने त्यात बदल न करता ती अट तशीच ठेवण्यात आली आहे. म्हणून आता अमिताभ बच्चन, दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, रवी पटवर्धन यांच्यासह 65 वर्षावरच्या सर्व तंत्रज्ञ, दिग्दर्शक, कलावंतांना आणखी काही काळ चित्रीकरणासाठी वाट पाहावी लागणार आहे.


इतर काही अटींमध्येही किरकोळ बदल/सुधारणा करण्यात आल्या असून चित्रिकरण सुलभ गोष्टी कशा होतील याचाच विचार यात करण्यात आला आहे. शिवाय, शासनाने घालून दिलेल्या नियम अटींची पूर्तता होते की नाही, हे पाहण्याचा अधिकार केवळ प्रशासनाला आणि त्यांच्या नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनाच असणार आहे. इतर कोणाही संघटनेला हे परीक्षण करण्याचा अधिकार असणार नाही. यावरुन सेटवर होणारे झगडे, धमकावण्याचे प्रकार होणार नाहीत. या अटींचं पालन न करणाऱ्यावर कठोर कारवाई होणार आहे.