मुंबई :  मार्च महिन्यापासून मनोरंजन क्षेत्रातल्या सर्वच मालिकांची चित्रिकरणं बंद आहेत. त्यालाही आता जवळपास अडीच महिने उलटून गेले. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चित्रिकरणाला सशर्त परवानगी दिल्यानंतर अनेक चॅनल, निर्माते यांनी मालिकांच्या चित्रिकरणाची मोट बांधण्याचा प्रयत्न चालवला आहे. कारण, सरकारने घालून दिलेल्या नियम अटींचं पालन होणं आवश्यक आहे. अशातच मनोरंजन सृष्टीसाठी आनंदाची बातमी अशी की मालिकांच्या चित्रिकरणाला आता सुरूवात होणार आहे. यात पहिली बाजी मारली आहे तुझ्यात जीव रंगला या मालिकेने. त्यामुळे कदाचित पुढच्या आठवड्यात सर्वांचा आवडता राणादा आणि अंजलीबाई नव्या एपिसोडसह सर्वांना भेटायला यायची शक्यता निर्माण झाली आहे. एबीपी माझाला मिळालेल्या विश्वसनीय व्यक्तींकडून ही माहिती मिळाली आहे.


कोल्हापूर जिल्ह्यात चित्रिकरण सुरू व्हावंं म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनीही कंबर कसली होती. एकिकडे जिल्ह्याने चित्रिकरणासाठी अंथरलेलं रेड कारपेट आणि दुसरीकडे चित्रिकरण सुरू व्हावं म्हणून राज्य सरकारने चालवलेले प्रयत्न याचं हे फलित म्हणावं लागेल. येत्या सोमवारपासून म्हणजे 22 जून पासून या मालिकेच्या चित्रिकरणाला सुरूवात होणार आहे. पूर्वी या मालिकेचं चित्रिकरण वसगडे गावाला व्हायचं. आता ते केर्ली या गावी होणार आहे. याची सर्व तयारी पूर्ण झाली असून अभिनेता हार्दीक जोशी, अक्षया देवधर यांसह अनेक कलाकार कोल्हापुरात दाखल झाले. अर्थात त्यालाही आता 10 दिवस उलटून गेले आहेत.

मुंबई -पुण्यातून आलेल्या सर्व कलाकारांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली. ती निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना 10 दिवस क्वारंटाईन करण्यात आलं. हॉटेलवर क्वारंटाईन झाल्यानंतर 10 दिवसांनंतर त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यानंतर पुन्हा त्यांची स्वॅब तपासणी होईल. ती निगेटिव्ह आल्यानंतर चित्रिकरणाला सुरूवात होणार आहे. सोमवारपासून चित्रिकरण सुरू झालं तर पुढच्या आठवड्यात प्रेक्षकांना लॉकडाऊननंतरचा नवा एपिसोड पाहता येणार आहे. या वृत्ताला झी मराठी वाहिनीनेही दुजोरा दिला आहे. शिवाय, लॉकडाऊन काळात एबीपी माझा देत असलेल्या मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांबाबत तुझ्यात जीव रंगलाच्या कलाकारांनी समाधान व्यक्त केलं.

आधी होणार मॉकशूट
येत्या सोमवारपासून जरी चित्रिकरण सुरू होणार असलं तरी आधी सर्व कलाकार, तंत्रज्ञ आदींना घेऊन लोकेशवर मॉकशूट होणार आहे. म्हणजे, नेमकं चित्रिकरण कसं करायचं. काय नियम पाळायचे. अंतर कसं ठेवायचं आदी गोष्टी समजावून सांगितल्या जाणार आहेत. त्यानंतर चित्रिकरणाला सुरूवात होईल. आपत्कालिन सेवेत काम करणारे फायर ब्रिगेडचे कर्मचारी किंवा सैनिक मॉक ड्रील कसं करतात तसंच हे मॉक शूट असणार आहे. यावेळी सेटवर वैद्यकीय अधिकारी, नर्स असणार आहेत. या सर्व नियमांसह नव्याने चित्रिकरण सुरू होत असल्याबद्दल अर्थातच तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील कलाकारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे..