Shivpratap Garudjhep: यंदा विजयादशमीचा मुहूर्त मराठी सिनेरसिकांसाठी एक अनोखी भेट घेऊन आला. मराठ्यांचं हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘शिवप्रताप गरुडझेप’ (Shivpratap Garudjhep) चित्रपट प्रदर्शित झाल्याचा आनंद चहूदिशांना पहायला मिळत आहे. ‘शिवप्रताप गरुडझेप’ या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केल्यापासून सर्वजण या महत्त्वाकांक्षी चित्रपटाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत होते. 5 ऑक्टोबर, विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा दिमाखदार प्रिमियर सोहळा नुकताच संपन्न झाला. शिवगर्जना, ऐतिहासिक प्रवेशद्वार आणि मान्यवर कलाकारांच्या उपस्थितीने 'शिवप्रताप गरुडझेप' चित्रपटाच्या प्रिमियरचा अवघा माहोल शिवमय झाला होता.


मुंबई, ठाणे, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खान्देश यांसह गुजरात, गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशासह ‘शिवप्रताप गरुडझेप’ (Shivpratap Garudjhep) चित्रपटाने दिल्ली या राज्यांतही जोरदार मुसंडी मारली आहे. डॉ. अमोल कोल्हे यांच्या मराठी रुपेरी पडद्यावरील छत्रपती शिवरायांच्या भूमिकेला प्रेक्षकांची कौतुकाची जबरदस्त थाप मिळत आहे. कार्तिक केंढे दिग्दर्शित या चित्रपटाच्या लेखन, दिग्दर्शन, गीत, संगीत, अभिनय, ॲक्शन ते अगदी व्हीएफएक्सपर्यंत सगळ्यांचेच कौतुक होताना पाहायला मिळतंय.


 






प्रेक्षकांकडून चित्रपटाचे व कलाकारांचे कौतुक!


आग्र्याहून सुटका ही मराठ्यांच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाची घटना आहे. आजपर्यंत कथा, कादंबऱ्या आणि इतिहासाच्या पुस्तकातून मांडण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा दैदिप्यमान इतिहास ‘शिवप्रताप गरुडझेप’च्या (Shivpratap Garudjhep) रुपाने प्रेक्षकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचेल अशी प्रतिक्रिया देत मान्यवरांनी चित्रपटाचे व कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक केले. ‘शिवप्रताप गरुडझेप’ला मिळत असलेलं प्रेक्षक, समीक्षक आणि मान्यवरांच प्रेम पाहता एका ऐतिहासिक विजयाच्या दिशेनं चित्रपटाने कूच केल्याचं दिसत आहे.


दिग्गज कलाकारांची फौज


'जगदंब क्रिएशन्स'ची निर्मिती असलेल्या ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटात डॉ. अमोल कोल्हे यांच्यासोबत यतीन कार्येकर, प्रतीक्षा लोणकर, हरक अमोल भारतीया, शैलेश दातार, हरीश दुधाडे, मनवा नाईक, पल्लवी वैद्य, अजय तपकिरे, रमेश रोकडे, अलका बडोला कौशल, आदी ईराणी, विश्वजीत फडते आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.  डॉ. अमोल रामसिंग कोल्हे, विलास सावंत, सोनाली घनश्याम राव, चंद्रशेखर ढवळीकर, कार्तिक राजाराम केंढे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. प्रफुल्ल तावरे सहनिर्माते आहेत. रविंद्र मानकामे कार्यकारी निर्माते आहेत. छायाचित्रण संजय जाधव यांचे असून संकलन पीटर गुंड्रा यांचे आहे. गीतकार हृषिकेश परांजपे यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार शशांक पोवार, रोहित नागभिडे यांचे संगीत लाभले आहे, तर पार्श्वसंगीत शशांक पोवार यांचे आहे.


हेही वाचा :


Shivpratap Garujhep : 'या हिंदुस्थानानं अनुभवला होता हा शिवप्रताप'; अमोल कोल्हेंनी शेअर केला 'शिवप्रताप - गरुडझेप' चित्रपटाचा टीझर