Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात घरातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दिव्या शिंदेची (Divya Shinde)बिग बॉसच्या घरातून हाकालपट्टी करण्यात आली होती. तलवार चालवणार या विधानामुळे दिव्या शिंदेवर बिग बॉसने इतर सदस्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव बाहेर काढलं. या तलवार प्रकरणामुळे बिग बॉसच्या घरातील वातावरण प्रचंड तापलं होतं. दरम्यान बिग बॉसच्या घराबाहेर पडताच दिव्याने आपल्याला खूप काही सांगायचं आहे अशी पोस्ट केली होती. आता तिने एक सूचक व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावरून शेअर केला आहे. विषय संपला नाहीये आता तर विषय सुरू झालाय असं ती म्हणताना दिसतेय.
दिव्या शिंदेचा व्हिडिओ समोर
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर दिव्या शिंदेने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ती म्हणाली "नमो बुद्धाय. जय भीम. जय शिवराय. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातून आणि प्रदेशातून तुम्ही मला जे प्रेम दिलेत आणि पाठिंबा दिलात, त्याबद्दल मी तुमची कायमच ऋणी राहील. लवकरच येतेय तुमच्यासमोर.आता विषय संपला नाही . सुरू झालाय. जय भीम. जय शिवराय. " असं दिव्य म्हणाली आहे.
दिव्याने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये बिग बॉस किंवा घरातील कोणत्याही सदस्याचा थेट उल्लेख केलेला नाही.पण तिचा रोख कोणाकडे होता याविषयी तर्क वितर्क लावले जात आहेत . विषय संपला नाही सुरू झालाय या कमेंट मुळे आता ती नेमकं काय खुलासा करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.
तलवार चालवण्याची धमकी
बिग बॉसच्या एका टास्कमध्ये तनवी कोलतेने दिव्याला नॉमिनेट केल्यामुळे दिव्या चांगलीच संतापली होती. संतापाच्या भरात तिने थेट तलवार चालवण्याची धमकी दिली. ती म्हणाली ' मी घराबाहेर सरकार म्हणून वावरते आणि माझ्या हातात कायम एक तलवार असते. आता ही तलवार घरी आहे याचा अर्थ असा नाही की मी इथल्या गोष्टी विसरेन. बाहेर गेल्यावर मी ती तलवार चालवेन. ती कोणावर चालेल हे तुम्ही माझ्याबद्दल काय बोलता यावर ठरेल ' अशी धमकी दिव्या शिंदेने दिली होती. यानंतर बिग बॉस ने तिला तिची चूक सुधारायची ही संधी दिली. तिला माफी मागायला लावली. पण तिनं कोणाचीही माफी मागणार नसल्याचे सांगत घराबाहेर जाणं पसंत केलं. आता तिने एक व्हिडिओ शेअर केलाय जात विषय संपला नाही आता तर सुरू झाला आहे अशी कमेंट केल्यानं खळबळ उडाली आहे.