Udit Narayan: बॉलिवूडचे प्रसिद्ध पार्श्वगायक उदित नारायण झा (Udit Narayan) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नी रंजना झा यांनी सुपौल महिला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करत उदित नारायण यांच्यासह त्यांच्या दोन भावांवर आणि दुसऱ्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. कट रचून उपचाराच्या नावाखाली आपले गर्भाशय काढून टाकल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.

Continues below advertisement

उपचार  करण्याच्या नावाखाली एक संगनमत करून परवानगीशिवाय गर्भाशय काढण्यात आले. याशिवाय फसवणूक, मानसिक छळ तसेच दिलेल्या आश्वासनांचा भंग केल्याचेही त्यांनी आरोप केले आहेत. सध्या प्रकृती बिघडलेली आणि आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या रंजनांनी न्याय मिळावा या अपेक्षेने पुन्हा पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

उदित नारायण यांची पहिली पत्नी रंजना झा यांनी तक्रारीत असा लिहिलंय की, 7 डिसेंबर 1984 रोजी त्यांचा उदित नारायण यांच्याशी हिंदू रीतीरिवाजांनुसार विवाह झाला. 1985 मध्ये करिअरसाठी उदित मुंबईला गेले. त्यानंतर माध्यमांमधून उदित यांनी दीपा नारायण नावाच्या महिलेबरोबर दुसरे लग्न केल्याची माहिती मिळाली. मात्र, याबाबत विचारणा केल्यावर त्यांना वारंवार दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप रंजनांनी केला आहे.

Continues below advertisement

रंजना झा यांनी यापूर्वी कुटुंब न्यायालय आणि महिला आयोगाकडेही धाव घेतली होती. तेथे उदित नारायण यांनी पत्नी म्हणून स्वीकार केल्याचे लेखी नमूद केल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही मदत मिळाली नसल्याने पुन्हा महिला पोलिस ठाण्यात तक्रार केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “वारंवार आश्वासन देतात, पण पूर्ण करत नाहीत. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे,” असे रंजना यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

‘1996 मध्ये उपचाराच्या नावाखाली गर्भाशय काढलं’

रंजना यांच्या म्हणण्यानुसार, 1996 मध्ये उपचारासाठी उदित नारायण, त्यांचे भाऊ संजय कुमार झा आणि ललित नारायण झा यांनी त्यांना दिल्लीतील एका मोठ्या रुग्णालयात नेले. तिथे त्यांच्या परवानगीशिवाय आणि माहिती न देता त्यांचे गर्भाशय काढण्यात आले. या वेळी उदित यांची दुसरी पत्नी दीपा नारायण देखील उपस्थित होती, असा आरोप त्यांनी केला आहे.

2006 मध्ये त्या मुंबईला गेल्या असता उदित आणि दीपा यांनी त्यांच्याशी गैरवर्तन करत घरात प्रवेश नाकारल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर नेपाळमधील सासरी गेल्यावरही त्यांना अपमानित करून परत पाठवण्यात आले. सध्या त्या माहेरी राहत असून आजारपण आणि आर्थिक अडचणींना सामोऱ्या जात असल्याचे त्यांनी नमूद केले.