मुंबई : अभिनेत्री परिणीती चोप्रा हिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या आगामी चित्रपटाचा पोस्टर चाहत्यांच्या भेटीला आणला. पण, याच कारणामुळं तिला सोशल मीडिया ट्रोलिंगचा शिकारही व्हावं लागलं. एकिकडे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या ‘The Girl On The Train’ च्या वाट्याला आलेल्या यशामुळं परिणीतीवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच दुसरीकडे 'सायना' (saina) या चित्रपटाच्या पोस्टरमुळं मात्र अनेकांनीच तिची खिल्लीही उडवल्याचं पाहायला मिळत आहे.


परिणीतीनं तिच्या या आगामी चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला आणला. चित्रपटाचा पोस्टर चाहत्यांच्या नजरेस पडताच त्यामधील चुकीच्या गोष्टी अधोरेखित करणाऱ्यांची रिघ लागली.


चित्रपट हा बँडमिंटनपटू सायना नेहवालच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर बेतलेला असल्यामुळं या खेळाशीच संबंधित असा शटल दाखवण्यात आला आहे. सर्व्हिस देण्यापूर्वी शटल हवेत उडवतानाच्या क्षणांचा आधार घेत हे कलात्मक पोस्टर साकारण्यात आलं खरं, पण मुळातच बॅडमिंटनचं शटल अशा पद्धतीनं उडवलं जात नसल्याचं सांगत ही टेनिस खेळातील सर्व्हिसची पद्धत असल्याचीच बाब अनेकांनी निदर्शनास आणून दिली.














... आणि त्या इसमानं थांबवली अजय देवगणची कार

ही एक चूक चित्रपटाला भलत्याच कारणामुळं चर्चेत आणण्यास कारणीभूत ठरली. ट्विटरवरही सायना या चित्रपटाचा ट्रेंड पाहायला मिळाला. अर्थात यामागची कारणं मात्र वेगळी होती. काहींनी तर, सायनानं या पोस्टरला सहमती दिलीच कशी असाही प्रश्न उपस्थित केला आहे. तेव्हा आता यावर चित्रपटातील कलाकार मंडळी नेमकं काय स्पष्टीकरण देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.