Dilip Kumar Passes Away : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं असून ते 98 वर्षांचे होते. आज सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे दिलीप कुमार यांना 29 जून रोजी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहितीही समोर येत होती. परंतु, प्रकृती अस्वास्थामुळे आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. आज सायंकाळी अभिनेते दिलीपकुमार यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात होणार आहेत.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तशा सूचना दिल्या आहेत.


दिलीप कुमार यांच्या आधी आणि दिलीपकुमार यांच्यानंतर...- अमिताभ बच्चन


बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांनी दिलीपकुमार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करत दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'जेव्हा भारतीय सिनेमाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा तो ‘दिलीप कुमार यांच्या आधी आणि दिलीपकुमार यांच्यानंतर' असा लिहिला जाईल. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो, असं ट्वीट करत अमिताभ बच्चन यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.






अमिताभ बच्चन यांच्या पाठोपाठ अभिनेता अक्षय कुमार, सोनू सूद, जावेद जाफरी आणि इतर काही कलाकारांनी सोशल मीडियावरुन श्रद्धांजली वाहिली आहे.


दिलीप कुमारांचं जाणं सांस्कृतिक जगतासाठी एक क्षती - नरेंद्र मोदी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलीप कुमार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. तसंच दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांना फोनवरून पंतप्रधानांनी धीर दिला आहे. सिनेसृष्टीतील एक आख्यायिका म्हणून दिलीपकुमारजी यांची आठवण कायम राहील. त्यांना अद्वितीय प्रतिभेचा आशीर्वाद मिळाला होता, त्यामुळेच अनेक पिढ्यांचे दर्शक मंत्रमुग्ध झाले. त्यांचं निघून जाणं आपल्या सांस्कृतिक जगतासाठी एक क्षती आहे. त्यांच्या कुटुंबीय, मित्र आणि असंख्य चाहत्यांप्रती संवेदना, श्रद्धांजली', असं आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.