मुंबई : सुशांतसिंग राजपूतची शेवटची फिल्म म्हणून दिल बेचाराकडे पाहिलं गेलं. त्याने केलेली आत्महत्या. त्यानंतर बॉलिवूडमध्ये सुरू झालेले वाद यामुळे एकूण आउटसायडर आणि त्यांना मिळणारी वागणूक यावर अनेकजण व्यक्त झाले. त्याच पार्श्वभूमीवर दिल बेचारा रिलीज झाला. डिस्ने हॉटस्टार यांनी हा सिनेमा रिलीज केला. संध्याकाळी साडेसात वाजता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच चाहत्यांच्या त्यावर उड्या पडल्या. पण हा सिलसिला शनिवारी सकाळपासून आणखी वाढला. आयएमडीबी या विश्वासार्ह पोर्टलवर चाहत्यांच्या या सिनेमाबद्दल प्रतिक्रिया येऊ लागल्या आणि या सिनेमाला सायंकाळपर्यंत रेटिंग मिळालं चक्क 9.8. सकाळी हे रेटिंग 10 पैकी 10 वर गेलं होतं.


आयएमडीबी ही मनोरंजनाची माहीत देणारी विश्वासार्ह वेबसाईट मानली जाते. 1990 मध्ये ही वेबसाईट बनण्यात आली. चित्रपट, मालिका, कलाकार आदींबद्दल योग्य माहिती.. चाहत्याचे रिव्हयू.. रेटिंग आदीसाठी हे पोर्टल योग्य मानलं जातं. दिल बेचारा रिलीज झाल्यानंतर आयएमडीबीवर या चित्रपटाचे रिव्हयू येऊ लागले. सुशांतने आत्महत्या केल्यानंतर त्याला प्रचंड सहानुभूती या सिनेमाद्वारे मिळालेली पाहायला मिळाली. शनिवारी सकाळी आयएमडीबीवर दिल बेचारा या चित्रपटाचं चाहत्यांनी 10 पैकी 10 रेटिंग दिलं होतं. त्यानंतर दिवसभर हा प्रकार चालू होता. काल संध्याकाळी हे रेटिंग 9.8 आलं आहे. हा आयएमडीबीवरचा विक्रम मानला जातो. आजवर कोणत्याही सिनेमाला 10 पैकी 10 रेटिंग मिळालं नव्हतं. सुशांतच्या सिनेमाने ते करून दाखवलं.

शुक्रवारी संध्याकाळी चित्रपट आल्यानंतर त्याला मिळणारा प्रतिसाद शनिवारी सकाळपासून वाढला. त्याच्या चाहत्यांनी आयएमडीबीवर जाऊन जाऊन प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली. त्यामुळे या पोर्टलवर इतका ताण आला की त्याचा सर्वर 40 मिनिटं बंद पडला. त्यानंतर तो पुन्हा सुरू झाला. याबद्दल बोलताना सुशांतच्या दिल बेचारा या चित्रपटाची फॅन सृष्टी देशपांडे म्हणाली, मी सुशातची चाहती आहेच. पण हा सिनेमा मला त्यापलिकडचा वाटला. आण्ही सगळे ग्रुपने आपआपल्या घरी हा सिनेमा पाहिला. पहाटे साडेचार वाजता आम्ही सगळे फ्रेंड एकमेकांशी बोललो. प्रत्येकजण रडत होता. सिनेमाचा विषय आणि सुशांतचं जाणं हे पुन्हा एकदा अनुभवायला मिळालं आहे. म्हणूनच आम्ही आयएमडीबीवर व्होट केलं. सुशांतचा शेवटचा चित्रपट हिट होणार आहेच.

सध्या दिल बेचारा या चित्रपटाला आयएमडीबीवर 9.8 रेटिंग असलं तरी ते 10 करण्याकडे हा सिनेमा पाहिलेल्या तरूणाईचा कल आहे. काही लोक या साईटवर सिनेमा तितका चांगला नसल्याचंही म्हणत आहेत. त्या लोकांना ही मंडळी ट्रोलही करताना दिसताहेत. यातून एकच गोष्ट लक्षात येते, सुशांतच्या जाण्याचा धक्का अजून भारतातली तरूणाई पचवू शकलेली नाही.

मुकेश छाब्रा दिग्दर्शित हा चित्रपट दोन प्रेमिकांची गोष्ट सांगतो. दुर्धर आजारााने ग्रस्त असलेलं प्रेमी युगुल आणि त्यांचे जगण्याबद्दलचे विचार. मरणाबद्दलची फिलॉसॉफी मांडण्याचा प्रयत्न इथे झाला आहे. द फॉल्ट इन आवर स्टार्स या हॉलिवूडपटावरून हा सिनेमा घेतला आहे.

रिव्ह्यू नक्की वाचा - Dil Bechara Movie Review |  हूरहूर..हळहळ आणि वेदना!