Dil Bechara Movie Review : दिल बेचारा.. हा मुकेश छाब्रा यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा. अर्थात याची गोष्ट ओरिजिनल त्यांची नाही. 2014 मध्ये आलेल्या द फॉल्ट इन अवर स्टार्स या सिनेमावरून हा चित्रपट प्रेरित आहे. अगदी महिन्याभरापूर्वीपर्यंत या सिनेमाची अशीच चर्चा होती. पण 14 जूनला एक हादरवून टाकणारी घटना घडली आणि या सिनेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. कारण या सिनेमाचा नायक असलेल्या सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केली. साहजिकच हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला. त्याचं अचानक निघून जाणं.. त्यानंतर आलेले वाद.. आणि त्यातून या सिनेमाची जाहीर झालेली तारीख.. यामुळे सुशांतसह एकूणच भारतभरातल्या सिनेप्रेमींना या सिनेमाची उत्कंठा होती.


खरंतर तो यातला क्लायमॅक्स नाहीच. मुळात एक गोष्ट सरळ आहे की हा काही आऊटस्टॅंडिंग सिनेमा नाही. किंवा हा विलक्षण अनुभव देणारा चित्रपटही नाही. हा एक सरळ साधा सिनेमा आहे. पण यातली सगळ्यात धक्का देणारी बाब आहे ती या सिनेमाची गोष्ट.. सिनेमाचा शेवट आणि वास्तव. सिनेमातला प्रेक्षक आणि हा सिनेमा पाहणारा प्रेक्षक.. म्हणजे आपण आता एकच आहोत ही भावना भयंकर अस्वस्थ करते. वेदना देते. हळहळ आणि हूरहूर माजवते.

किजी बसू आणि मॅन्यूअल राजकुमार ज्युनियर या दोघांभवती फिरणारी ही गोष्ट. दोघांनाही वेगवेगळ्या आजारांनी ग्रासलं आहे. किझी आपल्या आजाराने एकाकी पडत चालली आहे. नैराश्यात आहे. अत्यंत यंत्रवत पद्धतीने ती जगते आहे. अशावेळी तिची भेट होते मॅनीशी. मॅनी आणि किझीचे डॉक्टर एक आहेत. त्यावेळी कळतं की मॅनीलाही एक आजार आहे. पण उलट तो जगण्याकडे कमालीच्या सकारात्मक उर्जेने पाहातो आहे. अशात त्याला किझी दिसते. आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न तो करू लागतो. त्यातून हळूहळू त्यांची मैत्री होते. मग त्याचं रूपांतर प्रेमात होतं. अर्थात तेवढी त्याची गोष्ट नाही. कारण त्या गोष्टीला आजारांची किनार आहे. दोघांकडेही मर्यादित वेळ आहे. तो अधेमधे डोकावत असतोच. यातून ही गोष्ट पुढे जाते.

अशा गोष्टी घेतल्या की जगण्याची मरण्याची.. फिलॉसॉफी दिसते. म्हणजे अशा सिनेमातून ती बाहेर येणं अपेक्षित आहे. पण तसं इथे होत नाही. सिनेमा टप्प्याटप्प्याने पुढे जातो. शिवाय सिनेमाभर ज्या अभिमन्यू वीरचा संदर्भ येत राहतो.. ज्या अपूर्ण गाण्याचा संदर्भ येतो तो सीन तर फारच पोकळ झाला आहे. खरंतर त्या तिघांच्या संवादातून काहीतरी सकस, काळजात हात घालणारं बाहेर यायला हवं होतं असं वाटून जातं. म्हणून केवळ सुशांतचा चित्रपट म्हणून आपण ते समजून घेतो. पूर्वार्धात उत्स्फूर्त मॅनी पाहताना, सुशांत आज हवा होता. इतका एनर्जेटिक मुलगा असा कसा नाहिसा झाला असं वाटत राहतं. आणि चित्रपटाच्या उत्तरार्धात, मॅनीची अवस्था आणि सुशांतचं नसणं हळूहळुु एकरुप होऊ लागतं. म्हणून प्रेक्षक म्हणून सुशांतच आज आपल्यात नसणं अधिक गहिरं होऊ लागतं. सिनेमा अस्वस्थ करतो ते या भावनेमुळे.

सिनेमात असलेली गाणी.. त्याचं संगीत, छायांकन, कलादिग्दर्शन हा बाबीत काही खटकणारं नाही. पण त्याच्या पटकथेमध्ये आणि पर्यायाने संवाद लेखनामध्ये अशा पद्धतीच्या गोष्टीतून जे अपेक्षित आहे ते आणखी नेटाने बाहेर यायला हवं होतं असं वाटून जातं. चित्रपटात सर्वांनी चोख कामं केली आहेत. संजना संघीचाही हा खरंतर पहिला चित्रपट आहे. तिने अत्यंत आत्मविश्वासाने किझी रंगवली आहे. यातले काही प्रसंग सहकलाकारांमुळे छान झाले आहेत. यात आवर्जून उल्लेख करायला हवा तो मॅनी आणि किझीच्या वडिलांचा. भर पावसात झोपाळ्यावर बसून त्यांच्या जो संवाद दाखवला आहे तो कलाकारांच्या अभिनयामुळे आत घुसतो.

जीना और मरना हमारे हाथ नहीं होता. हम कैसे जिते है यह जरूरी है हा संवाद मॅनीच्या तोंडी आल्यानंतर आपल्या मनात लगेचच पडद्यावरच्या सुशांतसाठी प्रश्न तयार होतो, इथे मरण त्यानेच ठरवलं. एका प्रसंगात मॅनी म्हणतो, मैने हमेशा बडे सपने देखे लेकीन उसे कभी पुरा किया नही. हा संवाद आल्यावर सुशांतलाही असंच वाटलं असेल का असं वाटून जातं. अशा अनेक प्रसंगात प्रेक्षक म्हणून आपण मॅनी आणि सुशांत या दोघांच्या परिस्थितीसोबत वास्तवाला जोडत राहतो. त्यातून येणारी हळहळ ही सिनेमापलिकडची असते.

मुकेश छाब्रा सुशांतचा चांगला मित्र. त्याने सुशांतला घेऊन त्याच्यासाठी सिनेमा बनवला. तो तयार केला. पण रिलीज करताना त्याचा जवळचा हा मित्र हयात नव्हता. मग इतर सगळ्यांना घेऊन हा सिनेमा तो रिलीज करतो आहे. पण त्याचा मित्र तिथे नाहीय. सिनेमा पाहणाऱ्या प्रत्येकाला त्याची उणीव भासते आहे.. आता हे सत्य आहे.. सिनेमा यापासून वेगळा काढता येत नाही.
सिनेमा पाहिल्यानंतर येणारी अस्वस्थता यामुळे येते.
पिक्चर बिक्चरमध्ये या सिनेमाला मिळाताहेत तीन स्टार्स.