Digpal Lanjekar on Amey Khopkar: काही दिवसांपूर्वी मनसे नेते आणि 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक असणारे अमेय खोपकर यांनी  ' रणपती शिवराय स्वारी आग्रा' या बहुचर्चित चित्रपटाचे दग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्यावर कडाडून टीका केली होती. काही निर्माते खरंच शेफारले आहेत. काही निर्मात्यांची मस्ती उतरवायला हवी. त्यांना बॅन करण्याची गरज आहे.' असं म्हणत त्यांनी सिनेमाच्या प्रदर्शनावरून झालेल्या वादानंतर दिग्दर्शकाला चांगलंच सुनावल्याचं दिसलं. आता अमेय खोपकरांच्या टीकेवर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलंय.

Continues below advertisement

 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' आणि बहुचर्चित ' रणपती शिवराय स्वारी आग्रा' या दोन चित्रपटांची एकाच दिवशी टक्कर होणार आहे. दोन्ही चित्रपट 30 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहेत. चित्रपटाच्या तारखेवरून मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष आणि निर्माते अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी लेखक, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांवर (Digpal Lanjekar) तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

दिग्पाल लाजेकरांचं अमेय खोपकरांना प्रत्युत्तर 

दिग्पाल लांजेकर यांनी 'लोकमत फिल्मी'ला बोलताना सांगितलं," हा संपूर्णपणे निर्मात्यांचा निर्णय आहे. अमेय खोपकर यांचा बहुदा काहीतरी गैरसमज झालेला असावा. आमचं फोनवर बोलणं झालं होतं तेव्हाही मी त्यांना हे स्पष्ट केलं होतं की मी चित्रपटाचा निर्माता नाही. दिग्दर्शक आणि लेखक आहे. अर्थातच दोन मोठे मराठी सिनेमे समोरासमोर येऊ नयेत याच मताचा मीही आहे. आमच्या मुक्ताई या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख सहा वेळा बदलण्यात आली होती ती मराठी सिनेमांना न्याय मिळावा म्हणून. सुभेदार सिनेमा तीन वेळा पुढे ढकलण्यात आला  होता. त्यामुळे मराठी सिनेमाच्या हितासाठी तारीख बदलायला माझा कधीच नकार नसतो. यावेळेसही माझी भूमिका तीच आहे. दोन निर्मात्यांनी मिळून ठरवलं तर कोणत्याही चांगल्या तारखेला हा सिनेमा प्रदर्शित व्हावा. पण, हा निर्मात्यांनी घ्यायचा निर्णय असतो. माझं काम हे फक्त सिनेमा बनवणं आणि तो निर्मात्यांच्या मार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं एवढंच आहे".

Continues below advertisement

आम्ही फक्त छत्रपतींचे चित्रपट करतो. मराठी भाषा टिकवण्यासाठी आम्ही चित्रपट करतोय, त्यामुळे मराठी सिनेमा टिकवण्यासाठी आम्ही का प्रयत्न करणार नाही? सगळ्यांनी चर्चा करून तारीख ठरवावी हेच माझं म्हणणं आहे. प्रत्येक निर्माता तारीख ठरवताना व्यवसायाच्या अनुषंगाने विचार करत असतो. 

का बदलण्यात आली सिनेमाची तारीख?

दिग्पाल लांजेकर पुढे म्हणाले, फेब्रुवारीमध्ये बोर्डाच्या परिक्षा सुरू होत्या. त्यामुळे चित्रपटाची तारीख बदलण्यात आली आहे. हा सिनेमा नव्या पिढीने बघणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे सिनेमाची तारीख अलिकडे घेण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता, असं मला निर्मात्यांनी सांगितलं. याबाबत मी निर्मात्यांशी एका मर्यादेपर्यंतच चर्चा करू शकतो. त्यानंतर माझी व्यावसायिक मर्यादा संपते. त्यानंतर मला निर्मात्यांच्या मताचा आदर करणं गरजेचं आहे."