Manoj Muntashir on A R Rehman: ए.आर. रेहमान यांनी गेल्या काही दिवसांत केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत गेल्या आठ वर्षांत ‘पॉवर शिफ्ट’ आणि ‘सांप्रदायिक राजकारणा’मुळे आपलं काम कमी झाल्याचा दावा त्यांनी केला होता. या वक्तव्यानंतर मोठी टीका झाल्यानंतर रेहमान यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत स्पष्टीकरण दिलं. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता, असं सांगत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. दरम्यान,हिंदी चित्रपटसृष्टीबाबत केलेल्या ‘सांप्रदायिकते’च्या वक्तव्यावर आता प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘बॉर्डर 2’ चित्रपटाचे गीतकार आणि कवी मनोज मुंतशिर यांनी रेहमान यांच्या या दाव्याशी स्पष्टपणे असहमती दर्शवली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत कोणत्याही प्रकारचा भेदभाव होत नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे.

Continues below advertisement

शाहरूख, सलमान आमिर सर्वात मोठे सुपरस्टार

IANS ला दिलेल्या मुलाखतीत मनोज मुंतशिर म्हणाले, “हा तो देश आहे जिथे शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान हे सगळ्यात मोठे सुपरस्टार आहेत. जावेद अख्तर, साहीर लुधियानवी, मजरूह सुलतानपुरी यांसारखे लेखक-कवी आपल्या देशाने दिले आहेत. इतकंच नाही तर एकेकाळी भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व मोहम्मद अझरुद्दीन यांनी केलं होतं. अशा देशात किंवा इंडस्ट्रीत भेदभाव आहे, असं मला वाटत नाही.”

ते पुढे म्हणाले,“कोणताही हिंदी चित्रपट घ्या आणि त्याचे ओपनिंग किंवा एंड क्रेडिट्स पाहा. जवळपास 250 लोकांची नावं असतात. त्यात कोणत्या धर्माला विशेष महत्त्व दिलं आहे किंवा इतरांना डावलण्यात आलं आहे, असं कुठेही दिसणार नाही. मी कोणालाही आव्हान देतो.कोणताही चित्रपट उघडा आणि मला असं काही दाखवा. तुम्हाला ते सापडणार नाही.”

Continues below advertisement

आदर ठेवूनही असहमती व्यक्त करण्याचा आम्हाला हक्क

मनोज मुंतशिर यांनी ए.आर. रेहमान यांच्याविषयी आदर व्यक्त करत असतानाच मतभेद स्पष्ट केले.“ए.आर. रेहमान यांचा आम्हाला प्रचंड आदर आहे आणि ते आपल्या देशाचे आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. मात्र आदर ठेवूनही असहमती व्यक्त करण्याचा हक्क आम्हाला आहे. विशेषतः गेल्या आठ वर्षांत काहीतरी बदल झाल्याचा जो दावा केला जात आहे, तो मला पटत नाही. तो कालावधी का वारंवार उकरून काढला जातो, हेच मला समजत नाही,” असं ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले,“गेल्या आठ वर्षांत ‘पठाण’ आणि ‘जवान’सारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर सगळे विक्रम मोडले. हा देश मोठ्या मनाचा आहे. कलाकारांना तो धर्मावरून नाही, तर त्यांच्या कामावरून प्रेम देतो. काम चांगलं असेल, तर लोक कलाकारांना डोक्यावर घेतात. कधी रागावतातही, पण तो रागही आपुलकीतूनच असतो. हा देश आणि कलाकारांमधील नाताच तसं आहे. कुठल्याही प्रकारचा भेदभाव आहे, यावर माझा विश्वास नाही. समावेशकता हीच आपली ओळख आहे.” असे ते म्हणाले.