Eknath Shinde : बहुप्रतिक्षित 'धर्मवीर-2' (Dharmaveer 2) सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. या सोहळ्याला सिनेमातील कलाकारांसह अशोक सराफ, महेश कोठारे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची देखील उपस्थिती होती. धर्मवीर-2 या सिनेमाविषयी अनेकांना उत्सुकता आहे. कारण या सिनेमातून महाराष्ट्राच्या राजकारणातील कोणत्या घटनेचा उलगडा केला जाणार हा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण याचं उत्तर येत्या 9 ऑगस्ट रोजी सिनेमागृहांत प्रेक्षकांना मिळणार आहे. मात्र त्याआधीच सिनेमातील काही संवादांनी विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. 


दरम्यान या सिनेमातील काही संवादांमधून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला असल्याचंही म्हटलं जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या घरातला मुख्यमंत्री अशा शब्दांत वारंवार टीकास्त्र डागण्यात आलं आहे. त्याच मुद्द्यावरुन सिनेमातला एक संवाद असल्याचं म्हटलं आहे. या संवादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील स्पष्टीकरण देत भाष्य केलं आहे. 


सिनेमातील संवाद काय?


प्रसाद ओक आनंद दिघेंची भूमिका साकारत आहे. यामध्ये एक डायलॉग आहे की,नेता स्वत:च्या घरात नाही  लोकांच्या दारातच शोभून दिसतो. त्यावरुन पुन्हा एकदा रोख उद्धव ठाकरेंवर तर नाही ना असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान आता यावर उद्धव ठाकरे किंवा ठाकरे गटाकडून कोणाची प्रतिक्रिया येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 


मुख्यमंत्री शिंदे यांचं स्पष्टीकरण


ट्रेलर लॉन्च सोहळ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणादरम्यान या संवादाचा उल्लेख केला. त्यांनी म्हटलं की, या सिनेमात एक डायलॉग आहे, नेता स्वत:च्या घरात नाही  लोकांच्या दारातच शोभून दिसतो. म्हणून आम्ही शासन लोकांच्या दारात नेलं. अनेक योजना आम्ही लोकांच्या दारात जाऊन दिल्या. 


घरातून काम करण्यावरुन मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा


दरम्यान कोविडच्या काळात उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. त्या काळात त्यांनी घरातूनच काम केलं असा उल्लेख सत्ताधाऱ्यांकडून वांरवार होत असल्याचं पाहायला मिळालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांच्या अनेक भाषणांमधून उद्धव ठाकरेंचा उल्लेख असा करण्यात आला आहे. त्यांनी त्यांच्या एका भाषणादरम्यान म्हटलं होतं की, काही जणं घरात आजारी होते पण मी त्यांना असं इंजेक्शन दिलं की ते बरे झाले आणि घरातून बाहेर पडले. तसेच घरात बसून सरकार चालतं का? असा सवालही मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित करत उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा सिनेमाच्या माध्यमातून आणि आनंद दिघेंच्या भूमिकेतून उद्धव ठाकरे यांच्यावर याच मुद्द्यावरुन निशाणा साधला जात असल्याचं म्हटलं जातंय. 



ही बातमी वाचा : 


Dharmaveer 2 : सलमान खानचं जय हिंद, जय महाराष्ट्र; धर्मवीर 2 सिनेमाचा हिंदी ट्रेलर लॉन्च; भाईजानच्या दोनच शब्दात शुभेच्छा