Dhananjay Mahadik, कोल्हापूर : "लाडकी बहीणचे 1500 रुपये पैसे घेऊन काँग्रेस रॅलीत दिसणाऱ्या महिलांचे फोटो काढून पाठवा, त्यांची व्यवस्था करतो. कारण घ्यायचं आपल्या शासनाचे आणि गायचं त्यांचं असं चालणार नाही", असं वक्तव्या भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी केलं होतं. दरम्यान, धनंजय महाडिक यांच्यावर काँग्रेस नेत्यांनी टीकेची झोड उठवल्यानंतर आता त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. वोट जिहाद होऊ नये म्हणून हे वक्तव्य केलं असल्याचे स्पष्टीकरण महाडिक यांनी दिले आहे. 


धनंजय महाडिक काय म्हणाले?


धनंजय महाडिक वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देताना म्हणाले, विरोधकांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही. ज्या महिला लाडक्या बहिणी योजनेपासून वंचित आहेत. त्यांना या  योजनेचा लाभ देता येईल, याच्यासाठी फोटो आणि नाव घ्या, असं मी म्हणालो होतो. हे वक्तव्य मी वोट जिहाद होऊ नये म्हणून हे वक्तव्य केलं, लाडकी बहीण योजनेमुळे महिला महायुतीला भरभरुन मत देतील.


धनंजय महाडिक पुढे बोलताना म्हणाले, सर्वप्रथम माझ्या वक्तव्याने कुठल्याही माता भगिनींचे मन दुखावले असेल, तर त्यांची  माफी मागतो. माझे हे वक्तव्य कुठल्याही माता भगिनीचा अपमान करण्यासाठी मुळीच नव्हते. तर निवडणूक काळात राजकीय प्रचार करताना, विरोधी पक्षाच्या खोट्या प्रचाराला बळी पडनाऱ्या महिलांना, लाडकी बहीण योजना ही फक्त महायुती सरकार मुळेच यशस्वी झाली असल्याचे ठाम पणे नमूद करताना, चुकून आलेली प्रतिक्रिया आहे. 


मी माझ्या वैयक्तिक , राजकीय आयुष्यात महिलांचा नेहमीच सन्मान करत आलेलो आहे. मी आणि माझ्या पत्नी मार्फत गेली 16 वर्षे भागीरथी  महिला संस्थेमार्फत महिलांच्या आत्मनिर्भरते साठी  नेहमीच सकारात्मक काम करत आलो आहे आणि ह्या पुढे देखील करत राहीन. महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरण बाबत, आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत. तरीही  माझ्या वक्तव्याने मन दुखावलेल्या  माझ्या भगिनी मला मोठ्या मनाने माफ करतील, अशी आई अंबाबाईच्या चरणी मी प्रार्थना करतो, असंही महाडिक म्हणाले. 


सतेज पाटलांचे स्पष्टीकरण दिल्यानंतर प्रत्युत्तर 


धनंजय महाडिक यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर सतेज पाटील म्हणाले, आपण केलेली चूक चूक नाही म्हणायला देखील धाडस लागते. ते धाडस धनंजय महाडिक यांनी दाखवले. त्यांनी घेतलेला यू टर्न आहे पण आता गोल झाला आहे. राज्यातील संपूर्ण महिला याचा समाचार घेतील. भाजपचे नेते वेळोवेळी महिलांचा अपमान करत आहेत. राज्यातील महिला महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहतील.


इतर महत्त्वाच्या बातम्या


लाडकी बहीणचे 1500 रुपये पैसे घेऊन काँग्रेस रॅलीत दिसणाऱ्या महिलांचे फोटो काढून पाठवा, त्यांची व्यवस्था करतो : धनंजय महाडिक