Devmanus Fame Saru Aaji : ‘देवमाणूस’ मालिकेचा सध्या सुरु असलेला अध्याय रसिकांना सतत नव्या वळणांनी खिळवून ठेवतोय. अजित कुमारने पोलिसाचा खून केल्यानंतर आता त्याच्यावर लालीशी विवाह करण्याचा तगादा सुरु आहे. हे प्रकरण अजितकुमार कशा प्रकारे हाताळतो, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मालिकेत आणखी एक धक्कादायक ट्विस्ट येतोय. ‘देवमाणूस’च्या याआधीच्या पर्वात शिव्यांनी आणि दमदार अभिनयाने लक्ष वेधून घेणाऱ्या सरू आजी यांचा नवीन रूपात ‘नरू आजी’ म्हणून प्रवेश झाला होता. मात्र काही दिवसांतच या पात्राचा शेवट होणार असल्याचं संकेत आता दिसून येत आहेत. झी मराठीने नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित केला असून, तो पाहून प्रेक्षक चकित झाले आहेत.
कालच्या भागात काय घडलं?
गेल्या भागात गंगा आणि गोपाळ दोघं खरेदीसाठी बाजारात गेले होते. घरी परतताना विहिरीवर पाणी भरायला गेलेली लाली त्यांना एकत्र पाहते. गोपाळ गंगासाठी कपड्याचं माप घेत असतो आणि ती त्याला मिठी मारते, हे दृश्य लालीच्या नजरेस पडतं. गोपाळ लालीला तिथून हटकतो आणि दुकानात न येण्याची ताकीद देतो.
दुसरीकडे, गोपाळ मंग्याच्या दुकानात जातो आणि तिथे एक शेतकऱ्याचा मुलगा नैराश्याने आत्महत्येच्या प्रयत्नात असतो. त्याच्या हातात असते विषाची बाटली. मंग्या ती बाटली बाजूला करतो, पण गोपाळ ती उचलून घरी घेऊन जातो. घरी आल्यानंतर लाली त्याला विचारते की, "तुम्ही माझ्यासाठी विष आणणार होता का?" त्यावर गोपाळ तिच्यासमोर विषाची ती बाटली ठेवतो. हे सर्व पाहून लाली हादरते आणि म्हणते, “तुम्ही खरंच हे सगळं मनावर घेतलं होतं का?”
नवीन प्रोमोमधील धक्कादायक दृश्य :
आजच्या भागाचा प्रोमो पाहता एक मोठा धक्का बसतो. संपूर्ण कुटुंब जेवायला बसलेलं असताना नरू आजीला अचानक खोकला सुरु होतो. ती ऋतिकला औषध आणायला सांगते. ऋतिक चुकून गोपाळने लालीसाठी ठेवलेली विषाची बाटली औषध समजून देतो. नरू आजी ती पिते.
गोपाळ आणि लाली ही गोष्ट पाहतात, पण त्यावेळी काहीच करत नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी नरू आजी उठत नाही. ऋतिक तिला उठवण्याचा प्रयत्न करतो, पण ती काहीच प्रतिसाद देत नाही. अखेरीस सगळ्यांना वाटू लागतं की नरू आजीचं निधन झालं आहे.
खरंच नरू आजीचा अंत झाला आहे का?
हे फक्त एक अपघात आहे की अजून एक गूढ कट रचला जातोय? नरू आजीचा मृत्यू ही खरी घटना आहे की अजून एक क्लिफहॅन्गर? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. दोन आठवड्यांतच मालिकेतून नरू आजीची एक्झिट होणार असल्याच्या चर्चांना त्यामुळे उधाण आलं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ही प्रतिभा दुसऱ्या कोणाकडेही नाही, तो त्याच्या आवाजाने बरे करायचा आजार! रियाज करताना मृत्यूने गाठलं