Devkhel controversy: Zee 5 या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेली 'देवखेळ' ही वेबसिरिज टिझर प्रदर्शित झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गुहागर परिसरातील श्रद्धास्थान असलेल्या शंकासूर (Sankasur) देवाबाबत अपमानास्पद आणि धार्मिक भावना दुखावणारा मजकूर प्रसारित करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. या सीरिजमध्ये शंकासूरचं लोकांचा खून करतो असं दाखवण्यात आलंय. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी 'देवखेळ' ही वेब सीरिज त्वरित बंद करण्याची मागणी केली होती. त्यासंबंधी त्यांनी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांना निवेदन लिहिलं होतं. या निवेदनावर आता आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन लिहिलं आहे. प्राजक्ता माळी आणि अंकुश चौधरीची 'देवखेळ' ही वेब सीरिजमुळे कोकणवासियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. 

मोठ्या उत्साहात साजरा होणारा शिमग्याचा सण काही दिवसांवर आला असताना अशाप्रकारचे गढूळ वातावरण निर्माण होणे योग्य नाही. त्यामुळे याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी लक्ष द्यावे म्हणून तातडीने लक्ष वेधले आहे. असे ट्विट करत त्यांनी मुख्यमंत्र्यांना हे निवेदन लिहिलेय.

आशिष शेलार यांनी काय म्हटलंय? 

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या निवेदनात म्हटलंय,'देवखेळ' ही वेबसीरिज नुकतीच झी 5 या ओटीटीवर प्रसारित करण्यात आली आहे. ही वेबसिरिज रत्नागिरी जिल्ह्यातील 'नमन-खेळे' या लोककलेचे विपरीत चित्रण करणारी व या लोककलेतील लोकदैवत ठरलेल्या 'शंकासूर' या प्रमुख पात्राचे अवमानकारक चित्रण करणारी आहे, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या वेबसीरिजला कोकणातून तीव्र विरोध करण्यात येतो आहे. या लोक-कलेचे जतन संवर्धन करणाऱ्या कलावंताच्या विविध संघटनांनी त्याला विरोध करुन सरकार म्हणून मला निवेदनेही दिली आहेत.'

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील नमन खेळे ही अत्यंत लोकप्रिय व पौराणिक लोककला असून सामाजिक आणि धार्मिक महत्त्व प्राप्त झालेली ही हिंदू प्रथा परंपरा जतन करणाऱ्या लोककलेती एक अग्रगण्य लोककला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामदैवतांशी या लोककलेचा थेट संदर्भ असल्याने त्याला धार्मिक दृष्टीने एक पावित्र्य व अधिष्ठान ही प्राप्त झाले आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्यामार्फत ही कला जतन व संवर्धन करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करीत आहोत. कोकणात शिमग्यात या कलेचा जागर सर्वत्र होत असल्याने ९ ते ११ फेब्रुवारी दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे आपल्या शासनातर्फे या नमन कलेचा महोत्सव ही आयोजित करण्यात आला आहे. या कलेत योगदान देणाऱ्या कलावंतांना आपण राज्य शासनाचे पुरस्कार देऊन सन्मानित करतो तसेच तसेच वृध्द कलावंत मानधन योजनेतही या कलेचा समावेश शासनाने केलेला आहे. महाराष्ट्र शासनाने सन्मान केलेली ही लोककला आहे '

 

त्यामुळे या वेबसीरिजमुळे पौराणिक व खूप जुन्या लोकपरंपरेला धक्का लागला असल्याची जनमानसात भावना तीव्र दिसून येत आहे. या वेबसीरिजवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत असून वेबसीरिज विरोधात वाढता रोष व कोकणात मोठ्या उत्साहात साजरा होणारा शिमग्याचा सण जवळ आला असताना अशाप्रकारचे गढूळ वातावरण निर्माण होणे योग्य नाही. म्हणूनच आपण याबाबत लक्ष घालून तातडीने योग्य व उचित कारवाई करावी ही विनंती.' असं त्यांनी म्हटलं आहे.