Deepika Padukone: बॉलिवूडची टॉप अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या तिचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे आणि हा वाढदिवस तिच्यासाठी दुहेरी आनंद घेऊन आला आहे. एकीकडे वैयक्तिक आयुष्यात मातृत्वाचा नवा प्रवास, तर दुसरीकडे पती रणवीर सिंगच्या करिअरमधील मोठे यश. रणवीरची ‘धुरंधर’ ही फिल्म बॉक्स ऑफिसवर ऑल टाइम ब्लॉकबस्टर ठरली असताना, दीपिका मात्र काही काळ मोठ्या पडद्यापासून दूर होती. 

Continues below advertisement

2024 हे वर्ष दीपिकासाठी कामाच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरलं. ‘फायटर’, ‘कल्की 2898 एडी’ आणि ‘सिंघम अगेन’ अशा वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांमध्ये ती झळकली. मात्र सप्टेंबर 2024 मध्ये तिने मुलगी दुआला जन्म दिल्यानंतर तिने अभिनयातून थोडा ब्रेक घेतला. तेव्हापासून चाहते तिच्या कमबॅकची आतुरतेने वाट पाहत होते.

8 तासांच्या शिफ्टमुळे चित्रपट सोडावे लागले 

आई झाल्यानंतर दीपिकाने आपल्या कामाच्या वेळापत्रकात बदल करण्याची इच्छा व्यक्त केली. तिने 8 तासांच्या शिफ्टमध्ये शूटिंग करण्याची मागणी केली होती, जेणेकरून काम आणि कुटुंब यामध्ये समतोल साधता येईल. दीपिकाने स्पष्ट केलं होतं की, ही कोणतीही अवाजवी मागणी नाही, कारण इंडस्ट्रीतील अनेक पुरुष सुपरस्टार्स अशाच अटींवर काम करत आहेत.

Continues below advertisement

मात्र ही भूमिका संपूर्ण 2025 मध्ये बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरली. याच काळात ‘कल्की 2898 एडी’च्या पुढील भागातून दीपिका बाहेर झाल्याचं निर्मात्यांनी स्पष्ट केलं. तसेच संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘स्पिरिट’ या चित्रपटातूनही ती बाहेर पडल्याच्या चर्चा झाल्या. या दोन्ही प्रकरणांवर दीपिकाकडून अधिकृत प्रतिक्रिया आली नाही, मात्र 8 तासांच्या शिफ्टचा मुद्दा यामागे कारणीभूत असल्याचं मानलं गेलं.

'या' दमदार प्रोजेक्टमधून दीपिका पुन्हा करणार कमबॅक

पण आता हे सगळं मागे टाकत 2026 मध्ये दीपिका पुन्हा मोठ्या दमदार प्रोजेक्ट्ससह कमबॅक करत आहे. शाहरुख खान तीन वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परतत असलेल्या ‘किंग’ या चित्रपटात दीपिका लीड रोलमध्ये दिसणार आहे. या भूमिकेत ती एक सशक्त आणि प्रभावी कॅरेक्टर साकारणार असल्याचं बोललं जात आहे.

याशिवाय अल्लू अर्जुन आणि ‘जवान’ फेम दिग्दर्शक अ‍ॅटली कुमार यांच्या आगामी चित्रपटातही दीपिका मुख्य भूमिकेत असणार आहे. सध्या या प्रोजेक्टला AA22xA6 असं कोडनेम देण्यात आलं आहे. ‘पठान 2’ आणि ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्येही दीपिकाची उपस्थिती निश्चित मानली जात आहे.

हॉरर युनिव्हर्समधील नव्या चित्रपटाची चर्चा

अलीकडेच दीपिकाला मॅडॉक फिल्म्सच्या ऑफिसबाहेर पाहिलं गेलं, ज्यामुळे दिनेश विजन यांच्या हॉरर युनिव्हर्समधील एका महत्त्वाच्या चित्रपटात ती झळकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. तसेच विकी कौशलच्या ‘महावतार’ या, भगवान परशुरामांवर आधारित चित्रपटातही दीपिकाला महत्त्वाची भूमिका ऑफर झाल्याचं सांगितलं जात आहे.

40 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने दीपिका सध्या सेलिब्रेशन मोडमध्ये असली, तरी तिची आगामी चित्रपटांची यादी पाहता हे स्पष्ट होतं की 2026 मध्ये दीपिका पादुकोण पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आपलं वर्चस्व सिद्ध करण्यास सज्ज आहे.