BMC Election 2026: भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kiri Somaiya) यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) हे मुलुंडच्या वॉर्ड क्रमांक 107 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. वॉर्ड क्रमांक 107 ची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला देण्यात आली होती. मात्र, राष्ट्रवादीचा उमेदवारी अर्ज बाद ठरल्याने नील सोमय्या यांचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, या चर्चांना पूर्णविराम देत शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) अखेर नील सोमय्या यांच्या विरोधात उमेदवार मैदानात उतरवला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे दिनेश जाधव (Dinesh Jadhav) यांनी वॉर्ड क्रमांक 107 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने दिनेश जाधव यांना अधिकृत पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. यानंतर आता दिनेश जाधव यांनी नील सोमय्या यांच्यावर अनेक अपक्ष उमेदवारांना दमदाटी केल्याचा गंभीर आरोप केला. नील सोमय्या काहीतरी गडबड करणार, याची मला माहिती होती. त्यामुळे मी अपक्ष अर्ज भरला, असे देखील त्यांनी म्हटले आहे. आता दिनेश जाधव यांनी नील सोमय्या यांच्या विरोधात आरोप केल्यानंतर किरीट सोमय्या मैदानात उतरले आहेत.   

किरीट सोमय्या म्हणाले की, चोराच्या उलट्या बोंबा, दिनेश जाधवला घेऊन आले, त्यांनी स्वतःचा उमेदवार दिला नाही. राष्ट्रवादीने दगाफटका केला, त्यांना तुम्ही विचारा. आम्ही बिनविरोध झाले असे बोललेले नाही. आम्ही धमक्या दिल्या, असा एक प्रूफ दाखवावा. आम्ही आयोगात तक्रार दाखल केली आहे, त्यांनी जे वक्तव्य केले, तसे वक्तव्य करता येत नाही. त्यांना नोटीस दिली आहे, असा त्यांनी म्हटले. 

Kirit Somaiya on Dinesh Jadhav: महापालिका झाल्यानंतर चौकशी होणार आणि गुन्हा दाखल होणार

किरीट सोमय्या पुढे म्हणाले की, उमेदवाराला उमेदवाराविरोधात बोलता येत नाही. त्यांनी पुरावा द्यावा, हा दिनेश जाधव कोण? त्यांच्यावर गुन्हा दाखल, केस सुरू आहे. त्यांनी कोविड घोटाळ्यावर उत्तर द्यावे, आम्ही पुरावे दिलेले आहेत. उद्धव ठाकरेंनी कफनचोरला उमेदवारी दिली, त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. महापालिका निवडणूक झाल्यानंतर चौकशी होणार आणि गुन्हा दाखल होणार, असा इशारा देखील त्यांनी दिनेश जाधवांना दिलाय. 

Dinesh Jadhav on Neil Somaiya: नेमकं काय म्हणाले होते दिनेश जाधव? 

दिनेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते की, हा वॉर्ड मराठी भाषिक आहे. मराठी मतदार इथे जास्त आहेत. आमची पूर्वीपासून इच्छा होती की, हा वॉर्ड मनसे, शिवसेना, आणि राष्ट्रवादीच्या युतीत आम्हाला मिळायला हवा. परंतु, वाटाघाटीत ती जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला गेली. तरीसुद्धा एक शंका होती की, सध्या निवडणूक आयोग जे करत आहेत आणि तिथे ज्या प्रमाणात दादागिरी सुरू आहे, त्या भीतीपोटी कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसचा अर्ज मागे घेतला जाईल किंवा काहीतरी त्रुटी येईल. त्यामुळे मी 30 तारखेलाच अपक्ष फॉर्म भरून ठेवला होता. अजून काही अपक्ष उमेदवारांसोबत दमदाटी करण्यात आली होती. काही गुजराती उमेदवार होते. त्यांच्यासोबत देखील दमदाटी करण्यात आली होती. परंतु त्यांना ते शक्य झाले नाही. त्यांना वाटले की, नील सोमय्या बिनविरोध होईल आणि जिंकून येईल. पण, मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक असल्यामुळे ठरवले की नील सोमय्यांसोबत लढायचे, असे त्यांनी म्हटले आहे. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

BMC Election 2026: नील सोमय्यांच्या वॉर्डात गडबडीचा अंदाज ठाकरेंना आधीच आला; शेवटच्या क्षणी डाव कसा फिरवला, अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सगळंच सांगितलं