Mira Bhayandar Mahanagarpalika Eletion 2026: मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या स्थापनेचा इतिहास सांगायचं झाल्यास, सर्वात आधी 12 जून 1985 ला ग्रामपंचायत म्हणून स्थापन झाली. नंतर 23 जानेवारी 1990 रोजी चार ग्रामपंचायतींचा त्यात समावेश झाला आणि मिरा-भाईंदर नगरपालिका (Municipality) म्हणून अस्तित्वात आली.  त्यानंतर 2002 मध्ये याला महानगरपालिकेचा (Municipal Corporation) चा दर्जा देण्यात आला. या महापालिकेचे जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे इथे असून, ही महानगरपालिका मुंबई महानगर प्रदेशाचाच एक भाग आहे आणि 79.40 चौ. किमी क्षेत्र ती व्यापते.

नगरसेवकांची संख्या (Councillors / Members)

मिरा भाईंदर महानगरपालिका (MBMC) निवडणुकीत एकूण 24 प्रभागात, 95 नगरसेवक असणार आहे, 23 प्रभागात प्रत्येकी 4 सदस्य आणि भाईंदरच्या उत्तन येथील एका प्रभागात 3 सदस्य असणार आहेत.  या  95 पैकी 48 जागा महिला उमेदवारांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महिलांच्या प्रतिनिधित्वात वाढ होण्याची शक्यता आहे.  

मिरा भाईंदर महानगरपालिकेचा 2017 चा निकाल

मिरा भाईंदर महानगरपालिकेत 2017 मध्ये साधारणत 47 टक्के मतदान झालं होतं.  95 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत,  भाजपनं 61 जागा जिंकल्या होत्या.  त्या पटीत, शिवसेनेनं 22 जागा मिळविल्या होत्या.  काँग्रेसनं 12 जागा जिंकल्या होत्या.  याआधी 2012 मध्ये भाजपा प्रमुख नव्हती, त्यावेळी भाजपा 29,  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 27,  कॉंग्रेस 19, शिवसेना 14 अशी जागा विभागणी झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात युती झाली होती.  

मिरा भाईंदर महानगरपालिकेतील संख्याबळ (2017 MBMC Election Results )

पक्ष (Party)जागा (Seats)
भाजप (BJP)61
शिवसेना (Shiv Sena)22
काँग्रेस (Congress)10
अपक्ष02
एकूण95

मिरा भाईंदरची सध्याची लोकसंख्या अंदाजे 12 लाखांपर्यंत आहे. 2017 च्या निकालावर एक नजर मारली तर, गेल्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालेलं. तसेच, सत्ता स्थापनेतही महत्त्वाची भूमिका बजावलेली. सध्या मिरा भाईंदरमध्ये भाजपचे आमदार नरेंद्र मेहता आहेत. तर ओवळा माजिवडचा काही भाग मिरा भाईंदर क्षेत्रात आहे. तिथून शिवसेनेचे प्रताप सरनाईक जिंकून आलेत. त्यामुळे शिंदे गटासाठी यंदाच्या निवडणुकीत काहीसं अनुकूल वातावरण आहे. 

शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांचा प्रभाव कमी झाल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर नवीन आरक्षण आणि मतदार सीमांकनामुळे (वॉर्ड आरक्षण/पुनर्रचना) राजकीय घडामोडी वाढल्याचं समजतंय, काही दिग्गज नगरसेवकांना मोठा टक्का बसला आहे.  

मिरा भाईंदरमध्ये भाजपाचे नरेंद्र मेहता आणि शिवसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या दोघां नेत्यामध्ये नेहमी कलगीतुरा रंगतो. मात्र मिरा भाईंदरमध्ये भाजपची ताकद जास्त आहे.  यावेळी शिवसेनेच प्रताप सरनाईक यांनी समसमान जागा वाटपाची मागणी करत, जागेसाठी भीख नाही मांगणार, असं वक्तव्य केलेलं. तर नरेंद्र मेहता यांनीही प्रचाराचा नारळ फोडत निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा केलाय. त्यामुळे इथे महायुती होण्याची शक्यता धुसर आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचं आलबेल सुरु आहे. शिवसेना उबाठा गट, तसेच राष्ट्रवादी शरद पवार गट कॉंग्रेस आणि मनसे एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत.   

मिरा-भाईंदरचे महापौर कोण? 

महापौराचं नावकालावधी
जोत्सना जालिंदर हसनाळे2020 ते 2022
डिम्पल विनोद मेहता2017 ते 2020

मिरा भाईंदर महानगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम (Bhiwandi Election 2026)

  • नामनिर्देशन- 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
  • नामनिर्देशन पत्राची छाननी- 31 डिसेंबर
  • उमेदवार मागे घेणे- 2 जानेवारी 2026 पर्यंत
  • अंतिम यादी आणि चिन्ह- 3 जानेवारी 2026
  • मतदान- 15 जानेवारी 2026
  • मतमोजणी/निकाल-16 जानेवारी 2026

मिरा भाईंदरमधील स्थानिक प्रश्न

पाणी पुरवठा

अनेक भागांत अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्र प्रमाणात भेडसावते. टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ येथील नागरीकांवर आहे. जुन्या पाइपलाईनमुळे गळती व पाण्याची नासाडी ही मोठी समस्या आहे. 

वाहतूक कोंडी

मिरा रोड जंक्शन, काशिमीरा, भाईंदर पश्चिम, दहिसर टोल नाका येथे सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पश्चिम रेल्वेच्या लोकल मध्ये, मिरा रोड भाईंदर रेल्वे स्थानकात पीक अवर्समध्ये लोकल मध्ये चढायलाच मिळत नाही. त्यामुळे कार्यालयीन नागरिकांचे प्रचंड हाल होत असतात. शहरातील बेशिस्त पार्किंगमुळे ही वाहतूक कोंडीची समस्या वाढत आहे.

रस्त्यांची दुरवस्था

शहरात सिमेंट कॉक्रिटींकरणाचे रस्ते बनवण्याच काम सुरु आहे. माञ काही ठिकाणी काम सुरु असल्याने, वाहतुक कोंडीने नागरीकांचे हाल होत आहेत.  

ड्रेनेज आणि पावसाळी पाणी

अपुरी निचरा व्यवस्था असल्याने मिरा भाईंदरमध्ये काही ठिकाणी पावसात रस्त्यांवर पाणी साचण्याचे प्रमाण वाढत आहे. 

कचरा व्यवस्थापन

Swachh Survekshan 2024–25 मध्ये 3–10 लाख लोकसंख्या वर्गात MBMC ने राष्ट्रीय पातळीवर पहिला क्रमांक मिळवला आहे, म्हणजे स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनात महापालिका उत्तम कामगिरी करते आहे.  तसेच, भाईंदरच्या उत्तन येथील कचरा डेपो विरोधात नागरिकांचा रोष आहे.

आरोग्य सुविधा

शासकीय रुग्णालयांमध्ये अपुऱ्या सुविधा आहेत. डॉक्टर व स्टाफची कमतरता आहे. खासगी रुग्णालयांचा खर्च सामान्यांना परवडणारा नाही त्यामुळे पालिकेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्था वाढवण्याची गरज आहे. 

अनधिकृत बांधकामे

वाढती अनधिकृत घरं आणि व्यावसायिक इमारती ही एक समस्या आहे. त्यामुळे मिरा भाईंदर शहराच्या पायाभूत सुविधांवर ताण पडत आहे. तसेच बांधकामावर कारवाईवर राजकीय हस्तक्षेपाचे आरोप ही होत आहे. 

पर्यावरण सुरक्षेचे प्रश्न

वृक्षतोड, खारफुटीचा ऱ्हास यामुळे पर्यावरण-हिरवळीचा घट वाढत आहे. शहरी वस्तीत बिबट्या दिसण्याच्या घटना वाढत आहे. उत्तन, घोडबंदर, भाईंदर परिसरात ध्वनी आणि वायुप्रदूषण ही शहरात वाढत आहे

पार्किंग समस्या

निवासी जागा आणि बाजारपेठांमध्ये पार्किंगचा अभाव आहे. भाईंदर, बी.पी रोड, नवघर रोड, स्टेशन रोड येथे नेहमी वाहतूक कोंडी होत असते. रस्त्यावर वाहने उभी राहिल्याने ही वाहतूक कोंडी वाढत आहे. 

लोकसंख्या वाढ आणि नियोजनाचा अभाव

झपाट्याने वाढती लोकसंख्या, शाळा, मैदान, उद्याने अपुरी, शहर नियोजनाचा अभाव स्पष्ट यात दिसत आहे. 

दरम्यान, मिरा–भाईंदरमधील नागरी समस्या पाणी, रस्ते, वाहतूक आणि आरोग्य या चार प्रमुख मुद्द्यांभोवती फिरताना दिसतात. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत नागरिकांचा रोष आणि अपेक्षा या समस्यांवर उपाय देणाऱ्या पक्षाकडे झुकण्याची शक्यता अधिक आहे.