Dashavatar Trailer Out: सध्या मराठी सिनेमाला (Marathi Cinema) सुगीचे दिवस आलेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एकापेक्षा एक हिट सिनेमांची लडीच मराठी सिनेसृष्टीत लागली आहे. अशातच आता एका आगामी सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. हा सिनेमा म्हणजे, 'दशावतार' (Dashavatar Movie). या सिनेमात दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) मुख्य भूमिकेत आहेत. तर, महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar), भरत जाधव (Bharat Jadhav), सिद्धार्थ मेनन (Siddharth Menon), अभिनय बेर्डे (Abhinay Berde), प्रियदर्शिनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) अशी मराठी चित्रपटातील दिग्गज कलाकारांची फौज झळकणार आहे. झी स्टुडिओजची प्रस्तुती, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊसची निर्मिती असलेला 'दशावतार' हा सिनेमा 12 सप्टेंबर रोजी रीलिज होणार आहे.
'दशावतार' सिनेमाचं पोस्ट लॉन्च झाल्यापासूनच या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली होती. त्यानंतर सिनेमातलं हटके 'आवशीचो घो' हे गाणं रिलीज करण्यात आलेलं. गाणं रिलीज झाल्यानंतर गाण्याची जोरदार चर्चा रंगलेली. पोस्टर आणि टीझरनं प्रेक्षकांमध्ये आधीच प्रचंड उत्सुकता निर्माण केली असतानाच, आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या ट्रेलरनं धुरळा उडवला आहे. मराठीत आता खूप काहीतरी भारी येतंय, अशी प्रतिक्रिया ट्रेलर पाहून प्रेक्षक देत आहेत.
महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणात गणेशोत्सवाचं महत्त्व सर्वाधिक आहे. या गणेशोत्सवाप्रमाणेच कोकणात दशावतार ही कलापरंपरा तितकीच महत्त्वाची आहे. म्हणूनच येत्या गणेशोत्सवाच्या पाठोपाठ अवघ्या महाराष्ट्रात 'दशावतार'चं मोठ्या दिमाखात आगमन होत आहे.
'दशावतार' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये कोकणातील मातीचा गंध पाहायला मिळतोय. कोकणातील प्रथा, रुढी, परंपरा या सिनेमात दाखवण्यात आल्या आहेत. 'दशावतार' या कोकणातील परंपरेवर आधारित हा सिनेमा आहे. केवळ या कलेविषयीचे कथानक असून त्यात थ्रिलर, गूढ, सस्पेन्स आणि ड्रामा सर्वकाही आहे. ट्रेलरमध्येच या सर्व भावनांची झलक पाहायला मिळाली. कोकणातील इरसाल माणसांचे नमुने, प्रथा-परंपरा, दशावतारी नाट्यकला यांचा मिलाफ यामध्ये पाहायला मिळतोय.
'दशावतार'मध्ये नेमकं आहे तरी काय?
'दशावतार'मध्ये नेमकं आहे तरी काय, याची सर्वांनाच उत्कंठा आहे. कोकणातील इरसाल माणसांचे नमुने , तिथल्या प्रथा परंपरा, दशावतारी नाट्यकला यांचा सुरेख मिलाफ म्हणजे 'दशावतार'! कोकणातील समृद्ध निसर्गवैभव, गर्द देवराया, देवरायांचे राखणदार यांची गूढरम्यता म्हणजे दशावतार! कलासक्त वृद्ध दशावतारी बाबुली मेस्त्री आणि त्याच्या आयुष्यातल्या वादळांची गोष्ट म्हणजे 'दशावतार' आहे!! अर्थपूर्ण कथा, दमदार अभिनय आणि कर्णमधूर संगीत यांचा अप्रतिम संगम म्हणजेच हा 'दशावतार'.
'आवशीचो घो' गाण्याची रंगलेली जोरदार चर्चा
'आवशीचो घो' या आगळ्यावेगळ्या गाण्यानं कोकणच्या मातीचा गंध सोबत आणला आहे. अनेकांना शिवी वाटणारा हा शब्द खरंतर लाडानं वापरला जाणारा शब्द आहे. मालवणी भाषेत आईला प्रेमानं आवशी आणि नवऱ्याला घो असं म्हणतात. म्हणूनच आईच्या नवऱ्याला म्हणजेच, वडीलांना प्रेमाने 'आवशीचो घो' म्हणायची पद्धत आहे. 'दशावतार' चित्रपटातलं हे गाणं सुद्धा बाप आणि मुलाच्या अनोख्या नात्याबद्दल आहे.
दरम्यान, आगामी 'दशावतार' सिनेमात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर अशी मराठी चित्रपटातील दिग्गज कलाकारांची फौज असलेला हा मल्टीस्टारर सिनेमा आहे. विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर यांचा अप्रतिम अभिनय या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
पाहा ट्रेलर :