Actor Achyut Potdar Passes Away: बॉलिवूडसह (Bollywood News) मराठी सिनेमांमध्ये झळकलेले मराठमोळे ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार (Marathi Actor Achyut Potdar) यांचं निधन झालं आहे. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये (Jupiter Hospital Thane) वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सैन्यात कॅप्टन पदावरून निवृत्ती घेतलेल्या अच्युत पोतदार (Achyut Potdar) यांनी शिक्षण, भारतीय सैन्य दलात सेवा, इंडियन ऑइल कंपनीतील करिअर आणि अंतिमतः अभिनय या सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिलं. 'थ्री इडियट्स' मधील त्यांची भूमिका लोकांच्या चांगलीच लक्षात राहिली. 

मराठी अभिनेते अच्युत पोतदार यांचं सोमवारी निधन झालं. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अच्युत पोतदार यांनी आमिर खानच्या '3 इडियट्स' चित्रपटात प्राध्यापकाची भूमिका साकारली होती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. 19 ऑगस्ट रोजी ठाण्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण करण्यापूर्वी अच्युत पोतदार भारतीय सैन्यात होते आणि नंतर इंडियन ऑइल कंपनीत काम केलं. अभिनयाच्या आवडीमुळे त्यांनी 1980 च्या दशकात चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये प्रवेश केला, त्यानंतर त्यांनी चार दशकांहून अधिक काळ रुपेरी पडद्यावरुन आपली प्रतिभा दाखवली.

125 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं

अच्युत पोतदार यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत 125 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. 'आक्रोश', 'अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है', 'अर्ध सत्य', 'तेजाब', 'परिंदा', 'राजू बन गया जेंटलमन', 'दिलवाले', 'रंगीला', 'वास्तव', 'हम साथ रहना', 'हम साथ रहना', 'भाई', 'दबंग 2' आणि 'व्हेंटिलेटर' अनेक चित्रपटांमध्ये त्याच्या अभिनयाचं कौतुक झालं.

आमिर खानच्या '3 इडियट्स'मध्ये प्रोफेसरची भूमिका साकारली 

राजकुमार हिरानी दिग्दर्शित आमिर खानच्या '3 इडियट्स' चित्रपटात प्रोफेसरची भूमिका साकारून अच्युत पोतदार घराघरात पोहोचले. या सिनेमात 'क्या बात है' आणि 'कहना क्या चाहते हो?' हे त्यांच्या तोंडचे डायलॉग्स गाजले. आजही त्यांचे हे डायलॉग्ज सोशल मीडियावर मीम्ससाठी प्रचंड चर्चेत असतात.

अच्युत पोतदार यांनी छोटा पडदाही गाजवला 

चित्रपटांव्यतिरिक्त, अच्युत पोतदार यांनी छोट्या पडद्यावरही आपली छाप सोडली. त्यांनी 'वागले की दुनिया', 'माझा होशील ना', 'मिसेस तेंडुलकर' आणि 'भारत की खोज' सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं. त्यांनी त्यांच्या बहुमुखी प्रतिभेच्या माध्यमातून टीव्ही आणि चित्रपटसृष्टीत खूप नाव कमावलं. अच्युत पोतदार यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत खूप मोठं योगदान दिलं. मराठी आणि हिंदी चित्रपटांमधील अभिनेता म्हणून त्यांचं योगदान भावी पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहील.