Dara Singh : नितेश तिवारी यांची रामायण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या चित्रपटाची पहिली झलक नुकतीच प्रेक्षकांना दाखवण्यात आली होती. यामध्ये रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत तर यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या दोघांची झलक देखील प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. या चित्रपटात सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत झळकणार आहेत. प्रेक्षकांना सनी देओलला हनुमानाच्या भूमिकेत पाहण्याची उत्सुकता आहे. पण तुम्हाला माहित आहे का, दारा सिंह हनुमानाची भूमिका साकारून प्रचंड प्रसिद्ध झाले होते. त्यांनी रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत हनुमानाची भूमिका साकारली होती. दारा सिंह यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत एकूण चार वेळा हनुमानाची भूमिका केली आहे. या चारही वेळा प्रेक्षकांनी त्यांना भरभरून प्रेम दिलं.
21 वर्षांत चार वेळा बनले हनुमान
दारा सिंग यांनी 1976 ते 1997 या काळात चार वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये हनुमानाची भूमिका केली आहे. सर्वप्रथम ते बजरंगबली या चित्रपटात हनुमानाच्या भूमिकेत दिसले होते. त्यानंतर 1988 मध्ये बी. आर. चोप्रा यांच्या महाभारत मालिकेत त्यांनी पुन्हा हनुमानाची भूमिका साकारली. त्यानंतर त्यांनी रामानंद सागर यांच्या रामायण मध्येही हनुमानाचे पात्र साकारले. या मालिकेत त्यांनी साकारलेले हनुमान पात्र इतके गाजले की ते घराघरात पोहोचले. हनुमानाची भूमिका साकारण्यासाठी दारा सिंह यांनी खूप मेहनत घेतली होती. त्यांनी या भूमिकेसाठी मांसाहारसुद्धा सोडला होता.
दारा सिंग आधी होते कुस्तीगीर
दारा सिंह यांनी अभिनय करण्याआधी कुस्तीमध्ये कारकीर्द घडवली होती. त्यांनी सिंगापूरमध्ये हरमान सिंह यांच्याकडून कुस्तीचे प्रशिक्षण घेतले होते. त्यांना चॅम्पियन ऑफ मलेशिया हा किताब मिळाला होता. पाच वर्षे त्यांनी जगभरातील कुस्तीपटूंना पराभूत केले. ते भारताचे कुस्तीतील चॅम्पियन बनले होते. दारा सिंह यांची कुस्ती इतकी ताकदवान होती की, त्यांच्या समोर किंग कॉन्गसारखा कुस्तीपटूही टिकू शकला नाही. ते सर्वत्र लोकप्रिय होते. लोक त्यांना खूप प्रेम करत असत. ते राज्यसभेचे खासदार देखील होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या