Case Registered Against Remo D'Souza and Wife Lizelle: कोरिओग्राफर रेमो डिसूझा (Remo D'Souza) आणि त्याची पत्नी लीझेल डिसूझा (Lizelle D'Souza ) विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीरा रोड पोलीस स्थानकात रेमो आणि त्याच्या पत्नीविरोधात यासंदर्भात तक्रार दाखल झाली आहे. एका डान्स ग्रुपची 11.96 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने पोलिसांच्या हवाल्याने म्हटले आहे की, या प्रकरणी आणखी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका 26 वर्षीय डान्सरच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका अधिकाऱ्याने सांगितले की, 16 १६ ऑक्टोबर रोजी रेमो, लीझेल आणि इतर पाच जणांविरुद्ध आयपीसी कलम 465,420 आणि इतर संबंधित तरतुदींनुसार मीरा रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.ओमप्रकाश शंकर चौहान, रोहित जाधव, विनोद राऊत, रमेश गुप्ता आणि फ्रेम प्रोडक्शन कंपनींविरोधात हा गुन्हा दाखल झालाय.
रेमोवर काय आरोप आहेत?
एफआयआरनुसार, तक्रारदार आणि त्याच्या साथीदारांची 2018 ते 2024 या काळात फसवणूक झाल्याचा आरोप आहे. एफआयआरमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, एका टीव्ही शोमध्ये एका डान्स ग्रुपने परफॉर्म केले आणि पैसे जिंकले. दरम्यान रेमो आणि संबंधितांनी या ग्रुपचे प्रतिनिधित्व करत असल्याची चुकीची माहिती दिली आणि बक्षिसाच्या रकमेवर दावा केला.
रेमो कोरिओग्राफर, डायरेक्टर आणि डान्स शोचा जज
रेमो डिसूझा हा केवळ बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर नाही तर त्याने फालतू, एबीसीडी आणि रेस 3 सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. याशिवाय तो अनेक डान्स शोमध्ये जज म्हणूनही दिसला आहे. त्याने डान्स इंडिया डान्स, झलक दिखला जा, डान्स के सुपरस्टार्स, डान्स प्लस आणि डीआयडी लिटिल मास्टर सारख्या शोजचे जज केले आहेत.
रेमोचा आगामी चित्रपट
रेमो दिग्दर्शक म्हणून त्याचा आगामी 'बी हॅप्पी' चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर प्रसारित केला जाईल. या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि इनायत वर्मा मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात नोरा फतेही आणि जॉनी लीव्हरसारखे चेहरेही आहेत.