Suraj Chavan on Majha Katta : आई-बाप नावाचं डोक्यावर छत्र नाही, राहायला नीट घर नाही, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, लोकांकडून साध्या भोळ्या स्वभावाचा गैरफायदा घेतला जाणं, अशा सगळ्या खाचखळग्यातून त्याने मार्ग काढला. दु:खाच्या डहाळ्या लोंबकळत असताना दुर्दम्य इच्छाशक्तीची तोरणं लावून लोकांचं मनोरंजन करणाऱ्या मराठी बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi Season 5) या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणला (Suraj Chavan) आज महाराष्ट्रभरातून प्रेम मिळतंय. रीलपासून सुरु झालेला हा प्रवास रिअल लाईफमध्ये अनेकांसाठी कौतुकास्पद ठरतोय. याच प्रवासाविषयी सूरजने 'माझा कट्टा'वर (Majha Katta) दिलखुलास संवाद साधला.
अवघ्या महाराष्ट्रातून प्रेम मिळत असताना ते प्रेम भरभरुन स्वीकारणारा सूरज आज प्रत्येकाचा लाडका झालाय. बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापासून ते बिग बॉसची ट्रॉफी उचलण्यापर्यंत असा सगळाच प्रवास सूरजने माझा कट्टावर उलगडला आहे. विशेष म्हणजे 19 ऑक्टोबर रोजी सूरजचा वाढदिवस असतो. त्यामुळे माझा कट्टावर सूरजच्या वाढदिवसांचंही अगदी जंगी सेलिब्रेशन झालं.
'आता माझा गुलीगत बंगला होणार'
सूरजने बिग बॉसची ट्रॉफी उचलल्यानंतर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. इतकच नव्हे तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीच्या या लेकाची पुण्यात विशेष भेटही घेतली. याचवेळी अजित पवारांनी सूरजच्या घराविषयी सूचना देत त्याला नवं घर बांधून देणार असल्याचं जाहीर केलं. यावर सूरजने माझा कट्टावर बोलताना म्हटलं की, 'आमचं घर नव्हतं. आता माझं नवीन घर होणार आहे. माझा गुलीगत बंगला होणार आहे.'
सूरजने सांगितल्या लहानपणीच्या आठवणी
दरम्यान सूरजने यावेळी कट्टावर त्याच्या लहानपणीच्याही आठवणी सांगितल्या आहेत. 'मी लहानपणी खूप मस्ती करायचो. म्हणजे मी शाळेत मुलांची डोकी फोडायचो.. राग आला की असं व्हायचं माझ्याकडून.. दगडाने मी पोरांची डोकी फोडायचो.. क्रिकेटविषयीच्या आठवणी सांगताना सूरजने म्हटलं की, मी आधापासून क्रिकेट खेळतो. मला बॅटिंग,बॉलिंग आणि फिल्डिंग तिन्हीही येतं. मी वादळ येतं तशी बॉलिंग करतो. वेगाने असा स्टंप उडवतो आणि विकेच काढतो.'
सूरजच्या वाढदिवसाचं माझा कट्टावर सेलिब्रेशन
सूरज चव्हाणने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच माझा कट्टाला मुलाखत दिली. म्हणूनच एबीपी माझाच्या टीमकडून कट्ट्यावर सूरजचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याच्या वाढदिवसांचं सेलिब्रेशन सूरजने एबीपी माझासोबत केलं.