मुंबई: गुलाबी रंगाचा फेटा, पिळदार मिशा अशा रूपात जोतिबाचे दर्शन आजपर्यंत करोडो भाविकांनी घेतले आहे. कोल्हापुरातील जोतिबाच्या डोंगरावर असलेल्या या मंदिरात चैत्रयात्रेला मोठी गर्दी होते. दख्खनचा राजा या नावाने जोतिबा हे दैवत ओळखले जाते. जोतिबाचा महिमा मालिकेच्या रूपातून लवकरच छोट्या पडद्यावर येणार आहे. कोठारे व्हिजनने या मालिकेची निर्मिती केली असून जोतिबाची भूमिका कोण साकारणार ही चर्चा होती. आता सध्या या मालिकेच्या प्रोमोमधून अभिनेता विशाल निकम जोतिबाची भूमिका साकारणार असल्याचेही दिसून आलं आहे.
दरवर्षी विशिष्ट मालिकांचा ट्रेंड येत असतो. तसा छोट्या पडद्यावर काही महिन्यांपासून पौराणिक, देवी-देवतांच्या मालिकांचा ट्रेंड जोरावर आहे. खंडोबा, गणपती बाप्पा यांच्यासह आता ज्योतिबा देवाचीही मालिका तयार होऊ लागली आहे. कोल्हापुरातल्या चित्रनगरीमध्ये या मालिकेचं चित्रिकरण सुरू आहे. या मालिकेसाठी नव्या चेहऱ्याचा शोध सुरू होता. म्हणजे, जो चेहरा फार लोकांना माहीत नाही अशा चेहरा घेऊन त्यातून ज्योतिबा लोकांसमोर आणण्याचा मानस मालिकाकर्त्यांचा होता. त्याला आता यश आलं आहे. विशाल निकम हा कलाकार आता ज्योतिबाच्या रुपाने आपल्याला दिसणार आहे. या भूमिकेसाठी विशालने तब्बल 18 किलो वजन कमी केलं आहे. तर अनेक गोष्टी शिकूनही घेतल्या आहेत. विशाल यापूर्वी काही मालिकांत आणि चित्रपटात झळकला आहे.
विशालला बॉडीबिल्डिंगची खूप आवड आहे. व्यायामाच्या आवडीतून त्याने सिक्सपॅक अॅब्जही बनवले होते. पण जेव्हा त्याची निवड जोतिबाच्या भूमिकेसाठी झाली तेव्हा त्याला एका महिन्यात 12 किलो वजन कमी करावे लागेल अशी अट घालण्यात आली. जोतिबाच्या भूमिकेसाठी ती गरज असल्याने विशालही लगेच वजन कमी करण्याच्या तयारीला लागला. विशालसाठी पुढचा टास्क होता तो घोडेस्वारीचा. जोतिबाचे वाहन घोडा असल्याने मालिकेसाठी विशालला घोडेस्वारी येणे आवश्यक होतं. पण विशालने यापूर्वी कधीच घोडेस्वारी केली नव्हती. फक्त एक आठवड्यात विशालने घोडेस्वारीचे धडे गिरवले.
विशाल निकम हा शेतकरी कुटुंबातला आहे. सांगलीतल्या खानापूरमध्येच त्याने शालेय शिक्षण घेतलं. कॉलेजच्या शिक्षणासाठी पुण्यात आणि नंतर जिम ट्रेनर म्हणून त्याचा मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू झाला. नृत्याची आणि अभिनयाची आवड त्याला होतीच. धुमस या सिनेमात तो झळकला होता. अक्षया हिंदळकर हिच्यासोबत विशालने साता जन्माच्या गाठी या मालिकेत काम केलं आहे. या मालिकांनंतरही विशाल जिमट्रेनर म्हणून काम करतच होता. जेव्हा जोतिबा या मालिकेसाठी कास्टिंग सुरू होते तेव्हा विशालनेही आपले फोटो पाठवले. त्याची निवड झाल्याची बातमी त्याला कळाली आणि मग मात्र त्याच्या मनात गुलालाची उधळण सुरू झाली.
शेतकऱ्याचा पोर झाला दख्खनचा राजा, सांगलीचा विशाल झळकणार जोतिबावरच्या मालिकेत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Oct 2020 07:48 AM (IST)
दख्खनचा राजा जोतिबाचा महिमा मालिकेच्या रूपातून लवकरच छोट्या पडद्यावर येणार आहे. कोठारे व्हिजनने या मालिकेची निर्मिती केली असून जोतिबाची भूमिका कोण साकारणार ही चर्चा होती.
या मालिकेच्या प्रोमोमधून अभिनेता विशाल निकम जोतिबाची भूमिका साकारणार असल्याचेही दिसून आलं आहे.
NEXT
PREV
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -