मुंबई : 'झी' वाहिनीवर पुढील आठवड्यापासून प्रसारित होणाऱ्या 'बालशिव- महादेव की अनदेखी गाथा' या मालिकेविरोधात स्वामित्व हक्क कायद्याचे (कॉपीराईट) उल्लंघन केल्याचा दावा करत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याची दखल घेत हायकोर्टानं या मालिकेचे पहिले 10 भाग (एपिसोड) याचिकाकर्त्यांना दाखविण्याचे निर्देश 'झी' एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसला दिले आहेत. तसेच 31 ऑगस्ट रोजी सुरू होणारं मालिकेचं प्रक्षेपण 15 सप्टेंबरपर्यंत थांबवण्याची हमी 'झी' च्यावतीनं देण्यात आली. मालिकेचे प्रोमो आणि प्रक्षेपणाची नवीन तारीख जाहीर करण्याची मुभा त्यांना कोर्टाकडनं देण्यात आली आहे.
येत्या 31 ऑगस्टपासून 'झी' टिव्ही या वाहिनीवर 'बालशिव - महादेव की अनदेखी गाथा' ही मालिका प्रसारित होणार आहे. मात्र, पौराणिक कथाकार आणि तज्ज्ञ छोटेनैन सैनी यांनी मालिकेच्या प्रसारणाला विरोधात करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. बालशिव या कथेची संकल्पना आपली असून त्याच कथेचा आधार घेत 'झी' टिव्हीवर ही मालिका सुरू केल्याचा आरोप करत ही मालिका प्रसारित करण्यावर बंदी आणावी, अशी मागणी सैनी यांनी या याचिकेतून केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा साल 2018 मध्ये वाहिनीच्या काही प्रतिनिधींसमोर बालशिव या कथेची संकल्पना सविस्तरपणे आपण मांडली होती. ती कल्पना कोणत्याही कथा, कादंबऱ्या अथवा पुराणांनुसार नसून ती याचिकाकर्त्यांची स्वतःची कल्पना असल्याचा दावा त्यांच्यावतीनं अॅड. व्हि. धोंड यांनी केला. तसेच वाहीनीनं त्यांची संकल्पना चोरून मालिका बनविण्याचा घाट घातला असून हे स्वामित्व हक्क कायद्याचं उल्लंघन असल्याचंही त्यांन कोर्टाला सांगितलं.
मात्र केवळ 40 ते 50 सेकांदाच्या प्रोमोवरून सैनी यांनी त्यांच्या संकल्पनेचा वापर केल्याचा गैरसमज करू नये, तसेच बालशिव ही संकल्पना याआधीही अनेक पौराणिक मालिका आणि चित्रपटात दाखविण्यात आल्याची माहिती वाहिनीच्यावतीनं अॅड. वि. तुळजापूरकर यांनी दिली. तसेच मालिकेचे सध्या केवळ तीन महिने प्रसारित करण्यात येतील इतकेच भाग तयार असल्याचंही त्यांनी न्यायालयाला सांगितलं. त्यावर जर हा केवळ गैरसमज असेल तर तो दूर करता येईल. त्यासाठी मालिकेची पहिले 10 भाग याचिकाकर्त्यांनी पाहावेत, आणि जर तरी त्यांचा दावा कायम असेल तर पुढील सुनावणीत ऐकू असे निर्देश देत हायकोर्टानं ही सुनावणी तूर्तास तहकूब केली.