मुंबई : आता छोट्या पडद्यावरच्या अनेक मालिका-शोपैकी सर्वात चर्चेतला शो आहे बिग बॉस 14. सलमान खान या कार्यक्रमाचा होस्ट असल्यामुळे या शोकडे अनेकांचं लक्ष आहे. या नव्या कार्यक्रमात कोण कोण आहे, कोण नाही याची उत्सुकता आहेच. पण त्याहीपेक्षा महत्वाची बातमी अशी की या सगळ्या लोकांना बिग बॉसच्या घरात जाण्याआधी आणखी एका परीक्षेचा सामना करावा लागणार आहे.
बिग बॉसचा सीझन 14 आता येत्या 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यानिमित्त 14 स्पर्धक या घरात असणार आहेत. या सर्वच स्पर्धकांना क्वारंटाईन केलं जाणार आहे. 11 दिवसांचा क्वारंटाईन पिरिएड असून 20 सप्टेंबरपासून त्यांचा हा क्वारंटाईनचा काळ सुरू होणार आहे. बिग बॉसच्या वर्तुळात चर्चा अशी आहे की मुंबईच्या पश्चिम उपनगरातल्या एका पंचतारांकित हॉटेलात त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. अर्थात तिथेही गोपनीयता पाळली जाणार आहे.
स्पर्धक कोण आहे कुठे आहेत हे कुणालाही न कळता प्रत्येकाला घरात राहण्याबद्दल सूचना करण्यात आल्या आहेत. कोव्हिडची सध्याची स्थिती पाहता कुणालाही कसलाही धोका असून नये म्हणून ही काळजी घेण्यात येणार आहे. 11 दिवस क्वारंटाईन केल्यानंतर त्यांची कोव्हिड तपासणीही होणार आहे. त्यानंतर त्यांना ऑक्टेबरच्या 3 तारखेला थेट घरात प्रवेश दिला जाईल. सलमान खान थेट त्या घरात अवतरणार आहे.
बिग बॉस 14 ची चर्चा सध्या शिगेला पोचली आहे. अभिनेता सलमान खानच्या मानधनामुळेही हा शो चर्चेत असणार आहे. सलमानने या शोसाठी 250 कोटी रुपये घेतल्याचं कळतंय. इतकी भलीमोठी रक्कम देऊन हा शो होत असल्यामुळे शो नेहमीसारखा वादग्रस्त होईल यात शंका नाही. यंदाच्या बिग बॉसला आयपीएलचंही आव्हान असणार आहे. त्या सामन्यांमध्ये बिग बॉस आपलं लश्र वेधून घेतो का हे पाहाणं रंजक ठरणार आहे.