Coldplay : ब्रिटीश रॉक बँड कोल्डप्लेचा (Coldplay) जानेवारीमध्ये भारत दौरा होणार आहे. मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर तीन दिवस हा कॉन्सर्ट होईल. पण तत्पूर्वीच या कॉन्सर्टच्या तिकीटासाठी कोट्यवधी लोक प्रयत्न करत आहेत. त्यातच ज्या अॅपवरुन ही तिकीटं काढली जात आहेत त्यांच्या घोटाळा करत असल्याचा आरोप सध्या केला जातोय. त्याचसंदर्भात BookMyShow च्या सीईओंना आर्थिक गुन्हे शाखेकडून दोनदा समन्सही बजावण्यात आलं. 


या सगळ्या आरोप प्रत्यारोपांनंतर अखेर BookMyShow कडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. तसेच त्यांनी हे सगळे आरोप धुडकावून लावत त्यांची बाजूही मांडली आहे. यामध्ये त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा घोटाळा होत नसल्याची भूमिकाही BookMyShow ने मांडलीये. 


BookMyShow ने काय म्हटलं?


BookMyShow म्हटलं की, 'जवळपास 1.3 कोटी फॅन्स हे कोल्डप्लेचं तिकीट मिळवण्यासाठी 22 सप्टेंबरपासून प्रयत्न करतायत. त्याचप्रमाणे आम्ही आमच्याकडून प्रत्येक फॅनला तिकीट मिळवण्याची संधी देता येईल यासाठी प्रमाणिक प्रयत्नही केलाय. त्याचमुळे आम्ही प्रत्येक दिवशीच्या शोला प्रत्येकी चारच तिकीटं विकत होतो. त्याचप्रमाणे आमच्या प्रत्येक माध्यमातून त्यांना तिकीट बुकींसाठी मार्गदर्शन करणं, तसेच योग्य प्रकारचा संवादही साधला जात होता. त्यासाठी आम्ही queueing systemची व्यवस्था केली आणि समस्यांचे निराकरण केले, ज्यामुळे थोडा विलंब झाला. या दोन शोला मिळणाऱ्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर आम्ही तिसऱ्या शोचीही तिकीट विक्री सुरु केली. त्यालाही उत्तम असा प्रतिसाद मिळाला.' 


'पण आमच्या असं लक्षात आलं आहे की, अधिकृत विक्रीपूर्वी आणि नंतर  भारतात कोल्डप्लेच्या म्युझिक ऑफ द स्फेअर्स वर्ल्ड टूर 2025 ची तिकिटे अनधिकृत प्लॅटफॉर्मवरुनही विकली जात आहेत. BookMyShow चा अशा कोणत्याही अनधिकृत तिकीट विक्री प्लॅटफॉर्मशी कोणताही संबंध नाही ज्यामध्ये Viagogo आणि Gigsberg यांचा समावेश आहे.' 


'आमच्या असंही लक्षात आलं आहे की, अनधिकृत प्लॅटफॉर्मवरुन होणारी तिकीट विक्री ही कायद्याने निषेधार्ह आणि दंडनीय आहे आणि BookMyShow या गोष्टीचा तीव्र निषेध करत आहे. आम्ही याबाबत पोलिसांत तक्रार केली असून यासंबंधी त्यांना तपासात लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी सहकार्यही करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आम्ही आवाहन करतो की, अनधिकृत स्त्रोतांकडून खरेदी केलेली कोणतीही तिकिटे त्यांच्या स्वत:च्या जोखमीवर खरेदी केली असतील आणि  ती कदाचित अवैध किंवा बनावट तिकिटे असू शकतात. त्यामुळे अशा कोणत्याही प्लॅटफॉर्मवरुन तिकीट विकत घेऊ नका.'


 ही बातमी वाचा : 


Coldplay : बॅण्डचा कार्यक्रम, आरोपांचा आवाज; कोल्डप्लेमुळे BookMyShow का आलं वादाच्या फेऱ्यात?