CM Eknath Shinde on Ashok Saraf : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharshtra Bhushan Award) प्रदान करण्यात आला आहे.  'आपल्या अविस्मरणीय भूमिकांनी अष्टपैलू असणाऱ्या अशोक सराफ यांनी प्रेक्षकांची अभिरुची संपन्न केली. अवघ्या महाराष्ट्राला त्यांनी पोट धरुन हसवले. प्रसिद्धीचे इतकी वलय मिळूनही त्यांनी कधीही जमीनीशी नातं तोडलं नाही. खऱ्या अर्थाने ते मराठी मातीतील अस्सल हिरा आहेत', अशा भाषेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफयांच्या कार्याचा गौरव केला. मराठी चित्रपटसृष्टी साठी जे जे आवश्यक आहे, त्या सर्व सुविधा राज्यात उपलब्ध करून देण्याचा आणि जगाला हेवा वाटेल अशी फिल्मसिटी आपण तयार करु, असं आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिलं. हा अवघ्या महाराष्ट्रासाठी अमृताहुनी गोड क्षण असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं. 


महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण हा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आला आहे. तसेच  वरळी येथील डोम, एनएससीआय ( नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया) येथे गुरुवारी सायंकाळी 6.30 वाजता पार पडलेल्या 57 व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी अशोक सराफ यांनी रसिक प्रेक्षकांचे आभार मानले. अशोक सराफ यांच्यासह  मानाचा "गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार" ज्येष्ठ पार्श्र्वगायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात आला. 


'हा अवघ्या महाराष्ट्रासाठी गोड क्षण'


हा शब्द ज्याला खऱ्या अर्थाने ज्यांना लागू होतो ते नाव म्हणजे अशोक सराफ आहे. सलग ५० वर्षे असंख्य भूमिका करुनही ज्यांच्यात अभिनयाची आणि नवं काही तरी करून दाखविण्याची त्यांची भूक अजूनही कायम आहे.  अशोक सराफ हे वयाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना राज्य सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना देण्यात येतोय, हा अवघ्या महाराष्ट्रासाठी  केवळ अभिमानाचाच नाही तर अमृताहूनही गोड क्षण असल्याचं त्यांनी म्हटलं. 


मराठी रसिकांनी त्यांच्या अभिनयावर भरभरुन प्रेम केलं - मुख्यमंत्री शिंदे 


गेल्या वर्षी ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले आणि ज्येष्ठ निरुपणकार तिर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्याची संधी मला मिळाली. यावर्षी अशोक सराफ यांचा आपण गौरव करत आहोत. त्यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी रसिकांवर राज्य केले. प्रसिद्धीचे इतके वलय मिळूनही सराफ यांनी कधीही जमीनीशी नातं तोडलं नाही, असे त्यांनी सांगितले. मराठी रसिकांनीही त्यांच्या अभिनयावर भरभरुन प्रेम केले, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. 


ही बातमी वाचा : 


Ashok Saraf : 'रसिक प्रेक्षकांचे प्रेम कायम हृदयात राहील', ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण प्रदान