Chhaava Box Office Collection Day 13: विक्की कौशलचा (Vicky Kaushal) 'छावा' (Chhaava Movie) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगली कमाई करत आहे. 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकत आहे आणि दररोज कोट्यवधींची कमाई करत आहे. विक्की कौशलच्या अभिनयापासून ते चित्रपटाच्या कथेपर्यंत, सर्व काही प्रेक्षकांना प्रभावित करण्यात यशस्वी झाले आहे. अशा परिस्थितीत 'छावा' दररोज काही ना काही नवा विक्रम रचत आहे.
निर्मात्यांनी शेअर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, 'छावा'नं पहिल्या आठवड्यात 225.28 कोटी रुपये कमावले. चित्रपटाने आठव्या दिवशी 24.03 कोटी रुपये आणि नवव्या आणि दहाव्या दिवशी 44.01 कोटी रुपये कमावले. 'छावा'नं अकराव्या दिवशी 19.10 कोटी रुपये आणि बाराव्या दिवशी 19.23 कोटी रुपये कमावले. अशाप्रकारे, विक्की कौशलच्या चित्रपटानं 12 दिवसांत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एकूण 372.84 कोटी रुपये कमावले. आता 'छावा'च्या तेराव्या दिवसाच्या कमाईचे सुरुवातीचे आकडेही समोर आले आहेत.
'छावा'ची कमाई 400 कोटींच्या जवळपास
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, 'छावा' नं तेराव्या दिवशी रात्री 11 वाजेपर्यंत 21.75 कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे 'छावा'ला देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 400 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. तेराव्या दिवसाच्या कमाईसह, 'छावा'चं एकूण कलेक्शन 394.59 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.
'छावा'ची 'या' ब्लॉकबस्टर चित्रपटांवर मात
'छावा'नं तेराव्या दिवसाच्या कलेक्शनमध्ये श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2' ला मागे टाकलं आहे. 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'स्त्री 2' नं तेराव्या दिवशी 11.75 कोटी रुपये कमावले. याशिवाय 'छावा'नं अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' (18.5 कोटी - हिंदी कलेक्शन) आणि शाहरुख खानच्या 'जवान' (14.4 कोटी) या चित्रपटांनाही मागे टाकलं आहे.
तेलुगूमध्येही प्रदर्शित होणार 'छावा'
'छावा' हा चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित करण्यात आला असून आता चित्रपटांच्या निर्मात्यांनी मोठी घोषणा केली आहे. लवकरच आता 'छावा' हा चित्रपट तेलुगूमध्येही प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. 'छावा'चं तेलुगू व्हर्जन 7 मार्च रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित केलं जाणार आहे.
दरम्यान, 'छावा'मध्ये छत्रपती शिवरायांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर दाखवण्यात आली आहे. लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात विक्की कौशलनं छत्रपती शंभू राजांची भूमिका साकारली आहे. याव्यतिरिक्त रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्नाही महत्त्वाच्या भूमिकेत दिसून आले आहेत. रश्मिका मंदानानं महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. तर, मुघल बादशाह औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना दिसून आला आहे.