Celebrity MasterChef Winner: सध्या सोनी लिव्हवर सुरू असलेलं 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' भलतंच चर्चेत आहे. अशातच आता या शोला त्याचा विजेता मिळणार आहे. सेलिब्रिटी परिक्षकांना इम्प्रेस करण्यासाठी आणि शो जिंकण्यासाठी त्यांचे सर्वोत्तम प्रयत्न करत आहेत. सेलिब्रिटी मास्टरशेफचा हा पहिला सीझन आहे आणि लोकांना त्यांच्या आवडत्या स्टार्सना स्वयंपाकघरात धावपळ करुन वेगवेगळे पदार्थ तयार करताना पाहणं पसंत पडतंय.
सेलिब्रिटी बनवतायत नवनवे पदार्थ
'सेलिब्रिटी मास्टरशेफ' शोचा टीआरपी फारसा चांगला नाही, बरेच लोक शोचे व्हिडीओ ऑनलाईन शेअर करत आहेत. ते स्पर्धकांवर आणि त्यांच्या जेवणावर त्यांचं मत देत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, हा शो प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि फिल्म प्रोड्युसर फराह खान होस्ट करत आहे.
शोचे स्पर्धक
शेफ रणवीर ब्रार आणि शेफ विकास खन्ना हे या शोचे परीक्षक आहेत. या शोमध्ये स्पर्धक म्हणून तेजस्वी प्रकाश, निक्की तांबोळी, गौरव खन्ना, दीपिका कक्कर, अर्चना गौतम, उषा नाडकर्णी, राजीव अदातिया, कविता सिंह, फैसल शेख उर्फ मिस्टर फैसू, अभिजीत सावंत, आयशा झुल्का आणि चंदन प्रभाकर आहेत. यातील काही सेलिब्रिटी एलिमिनेशननंतर शोमधून बाहेर पडलेत.
टॉप 5 फायनलिस्ट
अभिजीत, चंदन, आयशा आणि कविता हे शोमधून एलिमिनेट झालेत. तर, दीपिकानं तिच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे शो सोडत असल्याचा खुलासा केला आहे. या शोचे अनेक BTS व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर फायरल होत असतात. तेजस्वी, गौरव, निक्की, फैसू आणि राजीव हे शोमधले टॉप 5 फायनलिस्ट असल्याचं बोललं जात आहे.
ग्रँड फिनालेचं शुटिंग पूर्ण
ग्रँड फिनालेचे शुटिंग पूर्ण झालं असून सर्व फायनलिस्टना सोनेरी अॅप्रन घातलेले दिसून आले आहेत. इंडिया फोरम्सनं दिलेल्या ताज्या वृत्तानुसार, अनुपमा फेम अभिनेता गौरव खन्नानं सेलिब्रिटी मास्टरशेफ जिंकला आहे. शोमधील त्याचा प्रवास अद्भुत होता. पहिल्या भागात, त्याला सांगण्यात आलेली की, त्याची डिश खाण्यायोग्य नाही आणि शेवटच्या आठवड्यात त्यानं स्वतःमध्ये बदल घडवून थेट 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'च्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.
सेलिब्रिटी मास्टरशेफचे टॉप 3 कोण?
रिपोर्ट्सनुसार, गौरव खन्ना हा सेलिब्रिटी मास्टरशेफचा विजेता ठरला आहे. तर अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही पहिली रनरअप आहे. निक्की तांबोळी या शोची दुसरी रनरअप ठरली आहे. दरम्यान, हे वृत्त मीडिया रिपोर्ट्सनुसार देण्यात आलं असून यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :