मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अधिकृत सूचना मिळाल्यानंतर सीबीआयने गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. बिहार सरकारच्या विनंतीवरून सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयने आज गुन्हा दाखल केला आहे. रिया चक्रवर्ती, इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सैम्युएल मिरांडा, श्रुती मोदी आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिहारमध्ये सुशांत सिंह राजपूतला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात संदर्भात रिया चक्रवर्ती आणि इतर सहा लोकांन विरोधात गुन्हा नोंदवला. तर ईडीने सुद्धा मनी लॉन्ड्रिंग संदर्भात गुन्हा नोंदवत या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे ज्यासाठी उद्या रिया चक्रवर्तीला ईडी कार्यालयात बोलावण्यात आले आहे.
8 जूनपासून आत्महत्येच्या दिवसापर्यंत, सुशांत-रियामध्ये संभाषण नाही
सुशांतच्या मृत्यूपूर्वीच्या एका आठवड्यापूर्वीच्या कॉल रेकॉर्डनुसार, रिया आणि सुशांत यांच्यात बोलणं होत नव्हतं. 8 जून ते 14 जून दरम्यान यादोघांमध्ये अजिबात बोलणं झालं नव्हतं. आणखी एक गोष्ट कॉल रेकॉर्ड्समधून समोर आली होती की, सुशांत आपल्या बहिणींच्या सतत संपर्कात होता.
14 जूनला सुशांत सिंह राजपूतने त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. मुंबई पोलिसांनी एडीआर दाखल करुन या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. पन्नास दिवस झाले 56 लोकांचे जबाब नोंदवण्यात आले मात्र मुंबई पोलिसांच्या तपासात काही ठोस निष्पन्न झालं नाही आणि म्हणूनच सुशांत सिंह राजपूतचे वडील कृष्ण कुमार सिंह यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर असमाधान व्यक्त केले. सुशांत सिंहच्या आत्महत्येमागे व्यवसायिक वैमनस्य तर नाही ना या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी आपला तपास पुढे नेला. बॉलीवुड मधील नामवंत व्यक्तींची चौकशी मुंबई पोलिसांकडून करण्यात आली पण मुंबई पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही.
संबंधित बातम्या :