झहीर-सागरिकाचा साखरपुडा, नजरा विराट-अनुष्काकडे
एबीपी माझा वेब टीम | 24 May 2017 02:51 PM (IST)
मुंबई : 'चक दे' गर्ल, अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटपटू झहीर खान यांचा साखरपुडा मंगळवारी मुंबईत झाला. या सोहळ्याला विराट आणि अनुष्का यांनी हातात हात घालून हजेरी लावल्यामुळे उत्सवमूर्तीपेक्षा त्या दोघांकडेच सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अनुष्का साखरपुड्याला आली होती, तर विराट पांढरा शर्ट आणि काळी ट्राऊझर घातली होती. गेल्यावर्षी युवराजच्या रिसेप्शनमध्येही विराट-अनुष्का शोस्टॉपर ठरले होते. त्यानंतर झॅक-सागरिकाच्या साखरपुड्यातही त्यांच्याकडेच सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. गेल्या महिन्यात सागरिका-झहीर यांनी ट्विटरवरुन आपल्या 'एंगेजमेंट'ची घोषणा केली होती. त्यानंतर मंगळवारी दोघांचा साग्रसंगीत साखरपुडा पार पडला. या सोहळ्याला सचिन तेंडुलकर आणि पत्नी अंजली, युवराज सिंग, रवीना टंडन आणि पती अनिल थडानी, रोहित शर्मा आणि पत्नी रितीका, मंदिरा बेदी, प्राची देसाई यांनी हजेरी लावली. 'झहीर खूप आधीपासून एंगेजमेंटची तयारी करत होता. मला अजिबात याबाबत कल्पना नव्हती. त्याने माझ्यासाठी इतकी सुंदर अंगठी घेतली आहे, याची पुसटशीही आयडिया नव्हती. मी त्या क्षणाचं वर्णनही करु शकत नाही. हा अनुभव आम्हा दोघांसाठी नेहमीच खास असेल.' अशा भावना सागरिकाने व्यक्त केल्या आहेत.