मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध पार्श्वगायक अभिजीतचं ट्विटर अकाऊण्ट सस्पेंड केल्यानंतर गायक सोनू निगमचाही तीळपापड झालेला दिसत आहे. सोनूने 24 ट्वीट करुन ट्विटर सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
काय आहेत सोनूचे महत्त्वाचे ट्वीट्स?
1. हॅलो प्रेस, ट्विटराईट्स, ट्विपल्स, ट्विटीऑस. माझ्या ट्वीट्सचे स्क्रीनशॉट्स घेण्यासाठी सज्ज व्हा, कारण ते फार काळ राहणार नाहीत.
2. मी ट्विटरला आणि माझ्या 70 लाख फॉलोवर्सना अलविदा करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे कदाचित त्यांचा भ्रमनिरास होईल, काही जण चिडतील, तर काही विघ्नसंतोषींना आनंद होईल.
3. तुम्ही झोपलेल्या व्यक्तीला जागं करु शकता, मात्र जागं असूनही झोपेचं सोंग घेणाऱ्यांना कसं जागं कराल?
4. प्रसारमाध्यमं विभागली गेली आहेत. काही राष्ट्रवादी आहेत, काही थंड रक्ताचे ढोंगी आहेत, ज्यांना आपल्या इतिहासात कुठलाच धडा घ्यायचा नाही.
5. माझ्या संतुलित दृष्टिकोनासाठी माझ्यावर कौतुकाचा वर्षाव झाला आहे, तर धर्मविरोधी वक्तव्यावर अतार्किक टीकाही झाली आहे.
6. एकीकडे लोक आशिर्वाद देतात, तर दुसरीकडे तुमचा जीव घेण्याची भाषा करणारेही असतात. तरुण मुलं, मुली आणि चिमुरडेही दहशतवाद्यांसारखे वागतात.
7. आर्मी जीमच्या पुढे गौतम गंभीरचा फोटो लावणारी महिला चालते, पण परेश रावल यांनी दुसऱ्या कोणावर तशीच टीका केली, तर खटकते.
8. अरुंधती रॉय यांना काश्मीरबाबत मत व्यक्त करण्याचा हक्क आहे, मात्र इतर कोट्यवधी भारतीयांच्या
हक्काचं काय?
9. आपण माणूस होणं बंद केलं आहे. आपण स्वाभिमानी मुस्लिम, हिंदू किंवा पाकिस्तानी असतो.
10. अभिजीतदा (भट्टाचार्य) यांनी वापरलेली भाषा चुकीची असेल, मात्र भाजप सेक्स रॅकेट चालवत असल्याचे शैला (रशीद) ने केलेले आरोप समर्थकांचा प्रक्षोभ होण्यास पुरेसे नाहीत का?
11. जर त्यांचं (अभिजीत) अकाऊण्ट डिलीट केलं, तर तिचं का नाही? प्रत्येक मोठ्या व्यक्तीला आई-बहिणीवरुन शिव्या देणाऱ्यांचं काय?
12. समतोल कुठे आहे? सगळं एकतर्फी का? सगळे ट्विटरवर संताप का व्यक्त करतात? सामंजस्याने चर्चा का होत नाही?
13. माणसाला सत्ता पचवता येत नाही, हेच खरं. त्यांना लगाम बसवायलाच हवा.
14. ट्विटरविरोधात माझा रोष नाही. मात्र ट्विटर खूप चांगला प्लॅटफॉर्म होऊ शकला असता. हे म्हणजे सिनेमागृहात पॉर्न फिल्म दाखवण्यासारखं आहे.
15. या एकतर्फीपणाच्या निषेधार्थ मी आज ट्विटर सोडत आहे. प्रत्येक तार्किक, समंजस, देशभक्ताने हे सोडायला हवं.
16. मला कोणताही धर्म नाही. मी स्वतःच्याच धर्माचं पालन करतो. ज्यांना हे नाही कळत, त्यांचं माझ्याकडून सांत्वन.
17. मी डावा नाही, मी उजव्या विचारसरणीचाही नाही. मी प्रत्येकाच्या मताचा आदर करतो.
18. मी चांगल्या उद्देशाने ट्विटर अकाऊण्ट डिलीट करत आहे. धन्यवाद ट्विटर