मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीचे ट्रॅजेडीकिंग अशी ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्यावर मुंबईतील
लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डिहायड्रेशनच्या तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे.


दिलीप कुमार यांची किडनी वयोमानापरत्वे व्यवस्थित काम करत नाही. त्यामुळे त्यांची देखरेख केली जात असल्याचं डॉक्टरांनी गुरुवारी सांगितलं. त्यांची प्रकृती स्थिर नसली, तरी गंभीर नाही. दिलीप कुमार शुद्धीवर असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झालेली नाही. त्यांच्या किडनीचं कार्य सुरळीत न झाल्यास रक्तात विषारी द्रव्यं निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे हृदय आणि फुफ्फुसांना धोका निर्माण होऊ शकतो, असंही डॉक्टर म्हणाल्याचे मीडिया रिपोर्ट्स आहेत.

'कालच्या तुलनेत दिलीप साहेबांच्या प्रकृतीत सुधार आहे. मात्र ते हॉस्पिटलमधील आहेत. डॉक्टर त्यांची व्यवस्थित काळजी घेत आहेत' अशी माहिती दिलीप कुमार यांची पत्नी, अभिनेत्री सायरा बानू यांनी दिली.