पुणे/सोलापूर : ‘सोनू तुला माझ्यावर भरवसा नाय काय...’ या गाण्याने सध्या धुमाकूळ घातला आहे. खरं तर हे गाणं खुप वर्षांपासून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात वेगवेगळ्या स्वरुपात गायलं जातं आहे. मात्र सध्या जे गाणं लोकप्रिय झालंय, ते सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी गावातील अजय क्षीरसागर आणि त्यांची पत्नी भाग्यशाली क्षीरसागर यांनी बनवलंय.


सध्या प्रत्येकाच्या मोबाईल, चौकाचौकात, एवढंच काय महाराष्ट्राच्या विधानसभेत देखील ‘सोनू तुला माझ्यावर भरवसा नाय काय’ हा प्रश्न गाण्यातून विचारला जातो आहे. या गाण्याच्या माध्यमातून विचारला जाणाऱ्या प्रश्नामुळे मुंबईतील खड्डयांचा प्रश्न यावर्षी पुन्हा चव्हाट्यावर आला आणि त्यावरुन मोठं राजकारणही झालं. मात्र, जानेवारी महिन्यात अजय क्षीरसागर यांनी हे गाणं बनवलं, तेव्हा या गाण्यावरुन एवढ महाभारत होईल याची कल्पनाही त्यांना नव्हती.

'सोनू' गाण्याचा जन्म....

‘सोनू’च्या गाण्याचा जन्म आठ महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडीतील अण्णाभाऊ साठे नगरातील छोट्याशा घरात झाला. आपल्या भावाला वेगळे काहीतरी गाणे देण्यासाठी अजय क्षीरसागर हे प्रयत्नात होते आणि त्याचवेळी त्यांच्या पत्नीने लाडाने ‘सोनू बाजारात चला’ असे अजयला म्हणाली. त्यावरुनच अजय यांनी गाणं लिहायला सुरुवात केली आणि ‘सोनू तुला माझ्यावर भरवसा नाय काय’ हे लोकगीत जन्माला आले.

...आणि 'सोनू' व्हायरल झालं!

व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर या गाण्याला मिळणारा प्रतिसाद पाहून अजय क्षीरसागर यांनी हे गाणं पत्नीसोबत रेकॉर्ड करायचं ठरवलं. पुण्याजवळील आळंदीमध्ये त्यांनी हे गाणं रेकॉर्ड करुन ते भावाला पाठवलं. अजय यांचा भाऊ अविनाश अवघडेने हे गाणे सोशल मीडियावर पोस्ट केलं आणि त्याच गाण्यावर अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर येऊ लागल्यावर त्यांना आपल्या गाण्यातील जादू समजली. या गाण्याची लोकप्रियता फक्त मराठी किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नाही. हिंदी आणि इतर भाषांमध्येही हे गाणं त्या त्या भाषेतील शब्दांसह तयार करण्यात आलं.

सोलापूरच्या मातीतला हिरा

सोलापूर जिल्ह्याला लोकसंगीताचा मोठा वारसा आहे. शाहीर अमर शेख यांच्या पासून प्रल्हाद शिंदे यांच्यापर्यंत आणि असे कितीतरी लोकप्रिय लोकसंगीतातील कलावंत या मातीने महाराष्ट्राला दिले. अजय क्षीरसागर यांच्या रुपाने नवोदित कलावंत सध्या कुर्डूवाडी येथून उदयास येऊ लागला आहे.

घरातच लोकगीतांची परंपरा

कुर्डूवाडी शहरातील अण्णाभाऊ साठे झोपडपट्टीमधील छोट्याशा घरात अजय यांचं कुटुंबं राहतं. आजोबा नामदेव भिसे यांच्यासोबत अभ्यासाच्या पुस्तकांऐवजी लोकगीतांचा सराव करण्यात अजय मग्न राहायचा. आजोबा एकतारीवर सुरेख भजने म्हणायचे. त्यांच्या तालमीत अजयचा गळा तयार झाला. लिहिण्याचीही आवड असलेल्या अजयने देवीची गाणी लिहून म्हणायला सुरुवात केली. त्याच्या आवाजाची छाप चंदन कांबळे या संगीतकाराला भुरळ पडून गेली आणि त्यांनी त्याला आपल्या सोबत घेतले. त्यांच्यासोबत अजय विविध कार्यक्रमातून लोकगीते सादर करू लागले. आता त्यांना व्यावसायिक ऑफर मिळू लागल्या असून ‘सोनू’ गाण्याला जन्म देऊनही त्याचे नाव फारसे कोणाला माहित नाही हे विशेष .