मुंबई : 'यलो' सिनेमात आपल्या अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकणारी गौरी गाडगीळने शैक्षणिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. स्पेशल चाईल्ड गौरी आता पदवीधर झाली आहे.

गौरी गाडगीळने कला आणि समाजशास्त्र विषयात पदवी मिळवली आहे. ही गूड न्यूज अभिनेत्री मृणाल कुलकर्णीने फेसबुकवर शेअर केली आहे. यलो चित्रपटात मृणालने गौरीच्या आईची भूमिका साकारली होती. मृणालच्या पोस्टनंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.



मृणाल लिहिते, "आमची गौरी गाडगीळ आता पदवीधर झाली आहे. कला आणि समाजशास्त्रात तिने पदवी मिळवली, खूप अभिमान वाटतोय. गौरी आणि तिची आई स्नेहा खऱ्या हिरो आहेत. वडील आणि बहिणीचं योगदानही विसरता येणार नाही. अफलातून कुटुंब. गाडगीळ कुटुंबाचं मनापासून अभिनंदन."

महेश लिमये दिग्दर्शित 'यलो' सिनेमातील गौरीच्या अभिनयाचं सलमान खानपासून मधुर भंडारकर या सगळ्यांनीच कौतुक केलं होतं. या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारातील स्पेशल ज्युरी पुरस्कार मिळाला होता. गौरीने बीजिंग पॅरालिम्पिकमध्ये भारताचं नेतृत्त्व करत रौप्य पदक पटकावलं होतं. आता शिक्षणातही तिने पदवी मिळवून अनेकांसमोर आदर्श ठेवला आहे. गौरीला भविष्यात तिला स्विमिंग कोच व्हायचं आहे.