मुंबई: लैंगिक अत्याचाराविरोधातील ‘मी टू’चं वादळ अद्याप सुरुच आहे. अनेक आरोपी चेहरे समोर आल्यानंतर आता ख्यातनाम अशा यशराज फिल्म्सनेही मी टू वरुन कारवाई केली आहे. यशराज फिल्म्सने बड्या अधिकाऱ्याला घरचा रस्ता दाखवला आहे. उपाध्यक्ष, ब्रॅण्ड पार्टनरशिप, टॅलेंट मॅनेजमेंट आणि बिझनेस व क्रिएटिव्ह हेड ही पदं सांभाळणारे आशिष पाटील यांना कंपनीतून काढून टाकण्यात आलं आहे. यशराज फिल्म्सने याबाबतची माहिती सोशल मीडियावर दिली आहे.


आशिष पाटील यांना सर्व पदावरुन मुक्त करत आहोत, असं ट्विट यशराज फिल्म्सने केलं आहे.

यशराज फिल्म्सने आशिष पाटील यांची उपाध्यक्ष, ब्रॅण्ड पार्टनरशिप, टॅलेंट मॅनेजमेंट आणि बिझनेस व क्रिएटिव्ह हेड ही सर्व पदं काढून घेत आहोत. या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने होत आहे, असं यशराज फिल्म्सने म्हटलं आहे.

आशिष पाटील यांच्यावर एका अभिनेत्रीने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. मात्र आशिष पाटील यांनी हे आरोप फेटाळले होते. संबंधित अभिनेत्रीने केलेले आरोप हे खोटे, बिनबुडाचे, काल्पनिक आणि अपमानकारक आहेत, असं आशिष पाटील यांनी म्हटलं होतं.

आशिष पाटील यांनी 10 ऑक्टोबररोजी सोशल मीडियावर याबाबतचं स्पष्टीकरण दिलं होतं. मी या महिलेला विनंती करतो की तिने समोर येऊन सर्व पुरावे सादर करावे. कारण मी कोणासमोरही माझी निर्दोषत्व सिद्ध करु शकत नाही. सत्य समोर येण्यासाठी मी कोणत्याही तपास यंत्रणेला संपूर्ण सहाय्य करेन, असं आशिष पाटील यांनी म्हटलं होतं.

महिलांसोबतचं गैरवर्तन खपवून घेणार नाही

दरम्यान यशराज फिल्म्सने महिलांसोबतचं गैरवर्तन खपवून घेतलं जाणार नाही, असं म्हटलं आहे. कुठेही महिलांसोबत होणारं गैरवर्तन किंवा महिलांचं शोषण हे अन्यायकारक आहे, ते सहन केलं जाऊ शकत नाही, असं यशराजने म्हटलं आहे. संबंधित महिलेला आम्ही सर्व माहिती देण्याची विनंती करु, जेणेकरुन जो कोणी दोषी आढळेल त्यावर कारवाई करता येईल, असं यशराजने नमूद केलं आहे.