मुंबई : क्रिकेट विश्वचषकाचे साखळी सामने सुरु झाल्यानंतर भारतीय चाहत्यांमध्ये क्रिकेटज्वर वाढत चालला आहे. सर्वसामान्यांसोबत सेलिब्रिटीही नखं कुरतडत क्रिकेट सामन्यांचा आस्वाद घेत आहेत. फक्त मॅच पाहण्यावरच न थांबता, त्यानंतर ट्विटरवर फोटो आणि कमेंटही पोस्ट केल्या जातात. अशातच रणवीर सिंहने केलेली पोस्ट त्याला महागात पडू शकते.

1983 मधील पहिल्या क्रिकेट विश्वविजेत्या संघावर आधारित '83' या सिनेमाच्या निमित्ताने रणवीर सिंह भारत-पाक सामना पाहण्यासाठी इंग्लंडला गेला होता. त्यावेळी त्याने क्रिकेटपटू हार्दिक पंड्यासोबत फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड केला. 'ईट. स्लीप. डॉमिनेट. रिपीट. द नेम इज हार्दिक. हार्दिक पंड्या. मा बॉय अनस्टॉपेबल' असं कॅप्शन रणवीरने दिलं.


रणवीरचं ट्ववीट पाहून डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियन ब्रॉक लेसनरचा या घोषणेवर कॉपीराईट असल्याचं ट्वीट त्याचा वकील पॉल हेमन याने केलं. 'ईट. स्लीप. कॉन्कर. रिपीट.' अशी मूळ घोषणा असल्याचं सांगत त्याने खटला दाखल करण्याचा इशाराही दिला. अर्थात, हेमनने हा इशारा गमतीत दिला, की खराखुरा, हे समजत नसलं, तरी त्यांचे ट्वीट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.

https://twitter.com/HeymanHustle/status/1141188960900849664

जेव्हा जेव्हा लेसनर रिंगमध्ये एन्ट्री घेतो, तेव्हा 'ईट. स्लीप. कॉन्कर. रिपीट'चा जयघोष होतो, हे चाहत्यांना लक्षात असेल. त्याच्या कपड्यांवरही ही ओळ छापलेली आहे. त्याचा कॉपीराईट असलेली लाईन वापरण्यावर बंदी असल्याचं लक्षात न आल्याने रणवीर अडचणीत येऊ शकतो.