मुंबई : भारतात #MeToo मोहीम सुरु झाल्यानंतर लेखिका-दिग्दर्शिका विनता नंदा यांनी अभिनेते आलोक नाथ यांच्यावर लैंगिक शोषणाच्या आरोप केल्यानंतर 'सिने अ‍ॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन'ने (सिंटा) कारवाई करत आलोक नाथ यांचे 'सिंटा'चे सदस्यत्व रद्द केले आहे. आलोकनाथ यांच्यावर सिंटासह 'फेडरेशन ऑफ वेस्टर्न सिने एम्प्लॉइज'नेदेखील सहा महिन्यांची बंदी घातली आहे.


सिंटाने आलोक नाथ यांना असोसिएशनमधून बडतर्फ केले आहे. तर, 'फेडरेशन ऑफ वेस्टर्न सिने एम्प्लॉइज'ने त्यांच्या सदस्यांना आदेश दिले आहेत की आलोक नाथ यांच्याशी असहकार पुकारा. त्यामुळे पुढील सहा महिन्यात कोणताही कलाकार आलोकनाथ यांच्यासोबत काम करु शकत नाही.

संघटनेने आतापर्यंत तीन वेळा आलोक नाथ यांना बैठकीसाठी बोलावले होते. परंतु तीनही वेळा आलोकनाथ बैठकीला गैरहजर राहीले. त्यामुळे अखेर संघटनेच्या कार्यकारी समितीने त्यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

काय आहे प्रकरण?
विनता नंदा यांनी भारतात #MeToo मोहीम सुरु झाल्यानंतर फेसबुकवर एक पोस्ट लिहीली. पोस्टमध्ये त्यांनी अलोकनाथ यांच्या नावाचा उल्लेख न करता आलोक नाथ यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले.

काय आहे प्रकरण? 80 आणि 90 च्या दशकात टीव्ही इंडस्ट्रीत लेखिका-दिग्दर्शिका-निर्माती म्हणून ओळख मिळवलेल्या विनता नंदा यांनी अलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. विनिता यांनी लिहिलेली 'तारा' ही मालिका 1993 मध्ये लोकप्रिय झाली होती. त्याच काळात अलोकनाथ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत होते.

विनता नंदा यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'त्याची पत्नी माझी बेस्ट फ्रेंड होती. आमचं एकमेकांच्या घरी येणं-जाणं होतं. मी तारा नावाची मालिका लिहित होते. तो माझ्या मालिकेतील नायिकेच्या मागे होता. तो दारुडा, निर्लज्ज होता, मात्र त्या दशकातील स्टार होता. माझ्या नायिकेला तो सेटवर त्रास द्यायचा, पण सगळे मूग गिळून गप्प होते. तिने आमच्याकडे तक्रार केली तेव्हा आम्ही त्याला काढून टाकायचा निर्णय घेतला. दोघांमध्ये शेवटचा सीन शूट करुन त्याला नारळ दिला जाणार होता, पण त्याला कुणकुण लागली. त्याच दिवशी तो दारु पिऊन सेटवर आला. शॉटला बोलवेपर्यंत तो पीत बसला. कॅमेरा रोल होताच तो नायिकेच्या अंगचटीला आला. तिने त्याला कानफटात लगावली. मी सांगितलं, यापुढे तू आमच्या कोणत्याही मालिकेत दिसणार नाहीस. नंतर मित्रांच्या मध्यस्थीमुळे आम्ही पुन्हा बोलायला लागलो' असं विनिता नंदा सांगतात.

'त्या व्यक्तीने (अलोकनाथ) आपल्या घरी आयोजित केलेल्या पार्टीला मी गेले होते. काही मित्रही तिथे होते. माझ्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळलं आहे, असं मला वाटत होतं. मला जरा वेगळंच जाणवायला लागलं. रात्री दोनच्या सुमारास मी पार्टीतून निघाले, पण कोणीच मला घरी सोडायला येण्याची तयारी दाखवली नाही, हे मला जरा विचित्रच वाटलं. तिथे फार काळ थांबणं मला ठीक वाटत नव्हतं, त्यामुळे घर लांब असूनही मी पायी जाण्याचं ठरवलं' असं विनता यांनी पुढे लिहिलं आहे.

'अर्ध्या रस्त्यात असताना त्याने (अलोकनाथ) माझ्याजवळ गाडी थांबवली आणि मला घरी सोडण्याचं आश्वासन दिलं. त्याच्यावर विश्वास ठेवून मी गाडीत बसले. त्यानंतर नेमकं काय झालं हे मला अंधुक आठवतंय. पण माझ्यावर दारु उडवली जात होती आणि माझं लैंगिक शोषण केलं जात होतं. मी दुसऱ्या दिवशी झोपेतून उठले, तेव्हा वेदनेची जाणीव झाली. माझ्यावर फक्त बलात्कार झाला नव्हता, तर माझ्याच घरात माझ्यावर भीषण अत्याचार झाले होते'