मुंबई : अभिनेता करण ओबेरॉयवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या तक्रारदार तरुणीला अटक करण्यात आली आहे. तक्रारदार तरुणीने स्वतःवरच हल्ला करुन घेत करणवर खोटा आळ घेतल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. व्यवसायाने ज्योतिष असलेल्या एका ओळखीच्याच तरुणीने गेल्या महिन्यात करण ओबेरॉयवर बलात्कार आणि खंडणीखोरीचा आरोप केला होता.


आपल्याला जामीन मिळू नये, म्हणून तक्रारदार तरुणीनेच हल्ल्याचा बनाव केला होता, असं करणच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आलं होतं. '25 मे रोजी दोघा दुचाकीस्वारांनी आपल्यावर हल्ला केला. अॅसिड हल्ल्याची धमकी देत आपल्यावर एक कागद भिरकावला. त्यावर केस मागे घेण्याची धमकी दिली होती' असा दावा तरुणीने केला होता. मात्र पोलिसांच्या तपासात तरुणीने हा बनाव रचल्याचं समोर आलं.

27 मे रोजी पोलिसांनी दोघा तरुणांची धरपकड केली. त्यावेळी हा पूर्वनियोजित कट असल्याचं एकाने सांगितलं. दोघांपैकी एक जण हा तरुणीच्या वकिलाचा चुलत भाऊ होता. दहा हजार रुपयांच्या मोबदल्यात हल्ल्याचा बनाव रचल्याचंही त्याने पोलिसांना सांगितलं.

मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात करण ओबेरॉयची 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर सुटका केली होती. संबंधित तरुणीने करणच्या विरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात बलात्काराची फिर्याद नोंदवली आहे. करणने खोटी आमिषं दाखवून लग्नाचं वचन देऊन बलात्कार केला आणि माझ्याकडून महागडी गिफ्ट्‌सही उकळली, असा आरोप यामध्ये केला होता.

करणची बाजू काय

आमच्यातील संबंध हे सहमतीनेच झाले होते, मी कधीही तिच्याकडून जबरदस्तीने पैसे घेतले नाहीत. तिला माझ्याशी लग्न करायचं होतं, परंतु मी जेव्हा संबंध तोडण्याबद्दल तिला सांगितलं, तेव्हापासून तिने माझ्यावर आरोप लावण्यास सुरुवात करत मला आणि माझ्या कुटुंबियांना त्रास देण्यास सुरुवात केली, असा दावा करण ओबेरॉयच्या वतीने वकील दिनेश तिवारी यांनी हायकोर्टात केला होता. मी तिला सतत टाळत होतो, तरीही ती नातेसंबंध काहीही करुन कायम ठेवण्याचा प्रयत्न करत होती, असंही याचिकाकर्त्यांनी कोर्टाला सांगितलं होतं.