मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहेत. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या आगामी 'पानिपत' चित्रपटात झीनत अमान छोटेखानी भूमिका साकारणार आहेत. अफगाण आणि मराठ्यांमध्ये झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर या सिनेमाचं कथानक बेतलेलं आहे.


अहमद शाह अब्दालीची व्यक्तिरेखा अभिनेता संजय दत्त साकारत असून त्याला लढा देणाऱ्या मराठा योद्धा सदाशिव रावांच्या भूमिकेत अभिनेता अर्जुन कपूर झळकणार आहे. अभिनेत्री क्रिती सेननही यामध्ये सदाशिवरावांची दुसरी बायको पार्वतीबाई यांची भूमिका साकारणार आहे. झीनत अमान या चित्रपटात सकीना बेगमची भूमिका साकारणार असल्याची माहिती आहे. याशिवाय मोहनीश बहल, कुणाल कपूर, पद्मिनी कोल्हापुरेही यामध्ये दिसणार आहेत.

झीनत अमान साकारत असलेल्या सकीना बेगम या होशियारगंजच्या शूर लढवय्या होत्या. त्यांनी सदाशिवरावांना मदत केल्याची नोंद आढळते. झीनत अमान पुढील आठवड्यात चित्रिकरणाला सुरुवात करणार आहेत. या सिनेमात त्यांचा लूक कसा असेल, याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता आहे. राजस्थानमध्ये चित्रपटाचं शूटिंग सुरु आहे. 6 डिसेंबर 2019 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होईल.

1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गवाही' चित्रपटात झीनत अमान यांनी आशुतोष गोवारीकरसोबत काम केलं होतं. 'पानिपत'च्या निमित्ताने तब्बल तीस वर्षांनी ते एकत्र येत आहेत. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात झीनत अमान यांनी अनेक ग्लॅमरस भूमिका साकारल्या होत्या. हरे रामा हरे क्रिश्ना, हीरा पन्ना, कुर्बानी यासारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत. गेल्या वीस वर्षांत बूम, डोन्नो व्हाय..., अगली या पगली यासारख्या काही मोजक्या चित्रपटात त्या दिसल्या आहेत.