मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आता राजकारणात प्रवेश करणार का? अशी चर्चा सध्या रंगली आहे. "आगामी लोकसभा निवडणुकीत करीनाला भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या," अशी मागणी काँग्रेसचे स्थानिक नेत्यांनी केली आहे. मात्र आता या प्रकरणावर करीना कपूरची बाजू समोर आली आहे. "माझं संपूर्ण लक्ष चित्रपटांवर आहे, राजकारणावर नाही," असं करीना म्हणाली.


"मागील अनेक वर्षांपासून भोपाळ लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे काम कोणी नेता नाही तर अभिनेता करु शकतो. करीना तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय असल्याने भोपाळची जागा जिंकणं सोपं होईल," असं भोपाळमधील काही काँग्रेस नगरसेवकांचं म्हणणं आहे. "त्यामुळे करीनाला उमेदवारी मिळावी," असा आग्रह या नगरसेवकांनी वरिष्ठांकडे धरला होता.

करीना काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवणार?

या वृत्ताबद्दल करीनाला विचारलं असता ती म्हणाली की, "मी केवळ चित्रपटांवर लक्ष केंद्रीत करत आहे. मी निवडणूक लढवण्याच्या वृत्तात कुठलंही तथ्य नाही. कोणत्याही पक्षाने माझ्याकडे निवडणूक लढवण्याबाबत विचारणा केलेली नाही."

भोपाळच्या राजघराण्याची सून
करीना कपूर भोपाळमधील पतौडी या राजघराण्याची सून आहे. करीनाचा पती सैफ अली खान आणि भोपाळ यांचा घनिष्ठ संबंध आहे. करीना तरुणाईमध्ये अतिशल लोकप्रिय आहे. तिचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. शिवाय भोपाळ आणि पतौडी घराण्यातील याच कनेक्शनचा फायदा करीनाला निवडणुकीत होईल, असा विश्वास काँग्रेसमधील नेत्यांना वाटत आहे. त्यामुळेच त्यांनी करीनाला उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.