मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट आणि चॉकलेट अभिनेता रणबीर कपूर एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचं दिसत आहे. त्यामुळे कपूर कुटुंबाची सून झाल्यास आलिया भटही बॉलिवूडला रामराम ठोकणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला. त्यावर आलियानेही छान उत्तर दिलं आहे.
इन्स्टाग्रामवर 'आस्क मी एनिथिंग'मुळे अनेक चाहते आपल्या लाडक्या सेलिब्रेटींना प्रश्न विचारायला लागले आहेत. आलियानेही चाहत्यांना हवे ते प्रश्न विचारण्याची संधी दिली आणि एका यूझरने तिला सर्वांच्या मनातला प्रश्न विचारला. 'लग्नानंतर तू अभिनय सोडणार का? आशा आहे तुझं उत्तर नकारार्थी असेल' असं त्याने म्हटलं.
कपूर कुटुंबात लग्न करुन गेलेल्या आधीच्या पिढीतील 'अभिनेत्री' सूनांनी आपल्या करिअरला रामराम ठोकला होता. रणधीर कपूर यांची पत्नी बबिता यांनी अभिनय कायमचा सोडला, तर ऋषी कपूर यांची पत्नी नीतू सिंग यांनीही मोठा ब्रेक घेतला होता. त्यामुळे चाहत्यांना हा प्रश्न पडणं साहजिक आहे.
'लग्नानंतर तुमचं स्टेटस वगळता काहीच सोडण्याची गरज नाही. जितकी वर्ष जमेल, तितकी वर्ष मी अभिनय करत राहणार' असं उत्तर आलियाने दिलं.
रणबीर आणि आलिया 'ब्रम्हास्त्र' या आगामी चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात बिग बी, मौनी रॉयही आहेत. झोया अख्तरच्या 'गल्ली बॉय'मध्येही ती रणवीर सिंगसोबत दिसणार आहे.