मुंबई : सलमान खानच्या आगामी 'दबंग 3' चित्रपटाच्या जबरदस्त तयारी सुरु आहे. दबंगच्या पहिल्या दोन भागांना मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर तिसऱ्या भागात काय घडणार, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. मात्र हा बहुप्रतीक्षित सिनेमा अभिनेत्री काजोलने नाकारल्याची चर्चा आहे.
दबंग 3 मध्ये खलनायिकेच्या भूमिकेसाठी काजोलला विचारणा झाली होती. मात्र खलनायिकेपेक्षा महत्त्वाची भूमिका तिला साकारायची होती, त्यामुळे काजोलने दबंगच्या निर्मात्यांना नकार दिल्याचं म्हटलं जातं. 'गुप्त' चित्रपटात खलनायिका साकारल्यानंतर तिला प्रेक्षक, समीक्षकांसह पुरस्कारही मिळाले होते. त्यामुळे व्हिलनचा रोल तिने का नाकारला, यावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
सेकंड इनिंगमध्ये काजोल चित्रपट स्वीकारण्यापेक्षा नाकारताना दिसत आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'दिलवाले'नंतर तिने एकही चित्रपट केलेला नाही. करण अर्जुन, प्यार किया तो डरना क्या, कुछ कुछ होता है या चित्रपटांमध्ये काजोल आणि सलमान ही जोडी एकत्र दिसली होती. त्यामुळे दोघांना एकत्र पाहायला चाहत्यांना नक्कीच आवडलं असतं. गेल्या दहा वर्षांत फना, यू मी और हम, माय नेम इज खान, दिलवाले यासारखे मोजकेच चित्रपट तिने केले आहेत.
एकीकडे सोनाक्षी आणि सलमान यांच्यात सारं काही आलबेल नसल्यामुळे पहिल्या दोन भागात मुख्य भूमिका साकारणाऱ्या सोनाक्षीला तिसऱ्या पार्टमधून डच्चू मिळाला आहे. सोनाक्षीनंतर परिणीती चोप्राच्या वाट्याला ही भूमिका येणार असल्याची चर्चा होती, मात्र त्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.