श्रेयस तळपदे हे नाव मराठी इंडस्ट्रीला नवं नाही. मराठी नाटकांतून श्रेयस अत्यंत कष्टाने मराठी चित्रपटांत आला आणि त्यानंतर तो हिंदी सिनेसृष्टीत गेला. तिथे त्याने अनेक मोठ्या बॅनरसोबत काम केलं. इक्बाल, ओम शांती ओम, गोलमाल अशा अनेक सिनेमांत तो दिसला. जवळपास 15 पेक्षा जास्त वर्षं हिंदी इंडस्ट्रीत काढल्यानंतर श्रेयसने एक धक्कादायक खुलासा केला आहे. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत त्याने बॉलिवूडमध्ये असलेली मानसिकता कथन केली आहे. 


श्रेयस तळपदे या मुलाखतीत म्हणतो, बॉलिवूडमधल्या मित्रांसाठी मी सिनेमे केले, इक्बालनंतर माझ्याकडे तशाच प्रकारच्या अनेक स्क्रीप्ट्स आल्या. पण मी त्या सगळ्याच स्विकारल्या नाहीत. कारण सिनेमा करतानाच मी अत्यंत निवडून गोष्टी घेत होतो. मला सुभाष घई यांचा अपना सपना मनी मनी हा सिनेमा आला होता. पण मी कमर्शिअल फिल्मस करायचा विचारच करत नव्हतो. त्यांनाही याचं नवल वाटलं. नंतरच्या काळात मी फिल्म्स केल्या. काही मित्रांसाठी केल्या. पुढे नंतर हेच मित्र माझ्या पाठीमागे माझ्याविरोधात बोलू लागले. बॉलिवूडमध्ये आपण मित्र म्हणवतो पण मित्र फार कमी असतात. अगदी 10 टक्केच लोक असतात जे तुमच्या प्रगतीने आनंदीत होतात. तुमच्या पाठीशी ते उभे राहतात. 


बॉलिवू़डमधल्या अनुभवाबद्दल बोलताना या मुलाखतीत श्रेयस म्हणाला, इंडस्ट्रीत माझे काही मित्र आहेत, ज्यांना मी सिनेमात आलो की त्यांना असुरक्षित वाटतं. इथवर ते थांबत नाहीत. तर मी सिनेमात येऊ नये यासाठीही ते प्रयत्न चालवतात. अशा मित्रांसाठी मी अनेक फिल्म्स केल्या. त्यांच्यासाठी म्हणून केल्या. पण नंतर हीच मंडळी माझ्याविरोधात माझ्या पाठीमागे बोलताना मला जाणवलं. इतकंच नव्हे, तर काही मित्रांनी मला वगळून फिल्मस केल्या. मग प्रश्न हा उरतो की असं असेल तर ते तुमचे मित्र असतात का? तर इंडस्ट्रीत 90 टक्के अशीच माणसं असतात. 


असं असूनही आज श्रेयस जिथे आहे तिथे समाधानी आहे. तो म्हणतो, असे अनेक वाईट अनुभव येतात. पण मला वाटतं तुम्ही क्रीझवर उभं असलं पाहिजे. एक बॉल असा येतो जो तुम्हाला सीमारेषेपलिकडे मारायचा असतो. त्यासाठी तुम्ही विकेट न फेकता क्रिझवर उभं राहणं आवश्यक असतं. मीच काय, पण अमिताभ बच्चन यांनाही अशा वाईट अनुभवांचा सामना करावा लागला. मी जेव्हा केव्हा डिप्रेस असतो तेव्हा मी आठवतो की मी तो आहे ज्याने इक्बाल केला आहे. आज मी जिथे आहे तिथे समाधानी आहे.