मुंबईः मराठी सिनेमातील 'बालक पालक', 'लय भारी' या हिट सिनेमांच्या निर्मितीनंतर आता दाक्षिणात्य आणि पंजाबी सिनेमांची निर्मिती करण्याची इच्छा रितेश देशमुखने व्यक्त केली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत रितेशने ही इच्छा व्यक्त केली.


 

 

प्रादेशिक सिनेमांची गरज ओळखणं गरजेचं आहे. मराठी सिनेमा सध्या बदलत आहे. तसंच प्रादेशिक भाषांमध्येही सिनेमा निर्मिती झाली तर त्या भाषांतील सिनेमे देखील चालतील, असा विश्वास रितेशने व्यक्त केला. यानिमित्ताने निर्माता म्हणून आपण व्यवसाय वाढवणार असल्याचं रितेशने सांगितलं.

 

जेनेलियाच्या साहाय्याने सिनेमा निर्मिती

 

पंजाबी सिनेमांच्या निर्मितीमध्ये आपले अनेक मित्र असल्याचं रितेशने सांगितलं. पत्नी जेनेलियाला देखील तमिळ आणि तेलुगू सिनेमातील कामांचा अनुभव आहे. त्यामुळे एकमेकांच्या साहाय्याने दाक्षिणात्य आणि पंजाबी सिनेमा निर्मितीमध्ये पाऊल ठेऊ, असं रितेशने सांगितलं.

 

 

जेनेलियाने 2012 साली आलेल्या 'तेरे नाल लव्ह हो गया' सिनेमात रितेशसोबत काम केलं होतं. जेनेलिया सध्या मुलांच्या देखरेखीमध्ये व्यस्त आहे. लवकरच दोघेही अमराठी सिनेमांच्या निर्मितीमध्ये उतरु, अशी इच्छा रितेशने व्यक्त केली आहे.