मुंबई : मुंबईतील गाजलेल्या नानावटी केसवर आधारित अक्षय कुमारच्या आगामी 'रुस्तम' चित्रपटातील नवीन गाणं रिलीज झालं आहे. 'रुस्तम वही' असे या गाण्याचे बोल असून सिनेमातल्या अक्षय कुमारच्या भूमिकेबाबत चाहत्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे.
'रुस्तम वही' हे रेट्रो स्टाईल गाणं सुक्रीती कक्करने गायलं आहे. मनोज मुंतशीर यांनी गाणं लिहिलं असून राघव सचर यांचं संगीत गाण्याला लाभलं आहे. अक्षयकुमारने या गाण्याच्या व्हिडिओची लिंक ट्वीट केली असून यातून सिनेमाचा सार या गाण्यात असल्याचं त्याने म्हटलं आहे.
रुस्तम सिनेमात अक्षय कुमार एका नौदल अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. रुस्तम पावरी असे या व्यक्तिरेखेचं नाव आहे. रुस्तमवर विक्रम मखिजा या पत्नीच्या प्रियकराच्या हत्येचा आरोप असतो.
अक्षयच्या पत्नीच्या भूमिकेत एलियाना डिक्रूझ झळकणार आहे. अर्जन बाजवा, एशा गुप्ता यांच्याशिवाय उषा नाडकर्णी, सचिन खेडेकर यासारखे मराठमोळे चेहरेही यात दिसणार आहेत. वेनस्डे, बेबी सारख्या चित्रपटाचे मेकर नीरज पांडे यांनी रुस्तमची निर्मिती केली असून टिनू सुरेश देसाई यांचं हे दिग्दर्शकीय पदार्पण आहे. विपुल रावल यांनी चित्रपटाची कथा-पटकथा लिहिली आहे.
काय आहे नानावटी केस?
नौदल अधिकारी के एम नानावटी यांनी पत्नीचा प्रियकर प्रेम अहुजाची हत्या केल्याचा आरोप होता. भारतातील न उलगडलेल्या हत्याकांडांपैकी नानावटी केस ही एक मानली जाते. बेबी, एअरलिफ्ट, हॉलिडे, स्पेशल 26 यासारख्या चित्रपटांमुळे अक्षयकुमारकडून चाहत्यांना अपेक्षा वाढल्या आहेत.
‘3 SHOTS THAT SHOCKED THE NATION’ अशी उत्सुकता वाढवणारी टॅगलाईन असलेला बहुप्रतीक्षित ‘रुस्तम’ येत्या 12 ऑगस्टला रिलीज होणार आहे.
पाहा व्हिडिओ :
https://twitter.com/akshaykumar/status/753054341234298880