मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक असलेला "पीएम नरेंद्र मोदी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला आहे. सलग पाचव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली आहे. विवेक ऑबेरॉयचा हा चित्रपट सुरुवातीपासून खूप चर्चेत होता. सुरुवातीला निवडणूक आयोगाने हा चित्रपट निवडणूक काळात प्रदर्शित करण्यास बंदी घातली. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शुक्रवारी 24 मे रोजी चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. परंतु चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सपाटून मार खाल्ला आहे.


'पीएम नरेंद्र मोदी'ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी (शुक्रवारी)अवघ्या 2.88 कोटी रुपयांची कमाई केली. शनिवारी आणि रविवारी चित्रपटाच्या कमाईत थोडी वाढ झाली खरी परंतु इतर चित्रपटांच्या तुलनेत ही वाढ खूपच कमी होती. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 3.76 कोटी, तर तिसऱ्या दिवशी 5.12 कोटी रुपयांची कमाई केली.

रविवारी कमाईत काही प्रमाणात वाढ झाल्याने चित्रपटाच्या निर्मात्यांना थोडा आनंद झाला होता. परंतु हा आनंद फार काळ टिकला नाही. सोमवारी चित्रपटाच्या कमाईत पुन्हा घसरण झाली. सोमवारी चित्रपटाने 2.41 कोटी आणि मंगळवारी 3.76 कोटी रुपयांची कमाई केली. पाच दिवसांमध्ये मिळून चित्रपटाने 16.19 कोटी रुपयांची कमाई केली आहे.


नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नरेंद्र मोदी नावाची त्सुनामी सर्वांनी पाहिली. मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएने देशात 353 जागा जिंकल्या. परंतु बॉक्स ऑफिसवर नरेंद्र मोदींची जादू चाललेली नाही.

हा चित्रपट 1200 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉयने नरेंद्र मोदींची भूमिका निभावली असून या चित्रपटामध्ये मोदींच्या बालपणापासून ते पंतप्रधान होईपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे.