नवी दिल्ली : सलमान खानच्या आगामी 'भारत' सिनेमात अभिनेत्री कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे. कॅटरिना कैफला ही भूमिका अगदी शेवटच्या क्षणी मिळाली होती. प्रियांका चोप्राला आधी या सिनेमासाठी साईन करण्यात आलं होतं. मात्र वैयक्तिक कारणामुळे प्रियांकाने हा सिनेमा सोडण्याच्या निर्णय घेतला आणि कॅटरिनाला हा सिनेमा मिळाला.
सिनेमाचं शूटिंग सुरू होण्याच्या काही दिवस आधी प्रियांकाने भारत सिनेमा सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निर्मात्यांचा मोठा अडचणींचा सामना करावा लागला. मात्र सलमानने कॅटरिनाला या भूमिकेसाठी साईन केलं.
याबाबत आणखी एक गोष्ट समोर आली आहे. 'भारत' सिनेमा साईन करताना आधी प्रियांकाने सिनेमा साईन केला आणि नंतर सोडला, हे आपल्याला माहित नव्हतं, असं कॅटरिनाने सांगितलं. एका वेबसाईच्या वृत्तानुसार कॅटरिनाने सांगितलं की, 'भारत' सिनेमासाठी कोणाची निवड झाली आहे, याची माहिती मला नव्हती. सलमान खानसोबत 'टायगर जिंदा है'च्या शूटिंगदरम्यान अली अब्बास जफरने मला भारत सिनेमासाठी विचारलं होतं.
प्रत्येकाचा एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. मी सलमानच्या प्रत्येक सिनेमात नाही असू शकत. जर प्रियांकाला आधी हा सिनेमा ऑफर करण्यात आला होता, तर तो नाकारण्यासाठी तिच्याकडे काही कारणे असतील. 'भारत'मध्ये काम करणं माझ्या नशिबात होतं आणि मी त्यासाठी आनंदी आहे. मी सिनेमाची स्क्रिप्ट वाचली त्यावेळी मला ती आवडली होती आणि माझ्या कारकिर्दितील ही सर्वात चांगली भूमिका आहे, असं कॅटरिनाने म्हटलं.