Vishakha Subhedar on Ekda Yeun Tar Bagha Movie : अभिनेत्री विशाखा सुभेदार (Vishakha Subhedar) सध्या चर्चेत आहे. 'एकदा येऊन तर बघा' (Ekda Yeun Tar Bagha) हा तिचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील विशाखा सुभेदारचा लूक आता समोर आला आहे. तिचा शार्प शूटर लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
अभिनेत्री विशाखा सुभेदार सध्या तिच्या बेधडक आणि डॅशिंग अंदाजामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. हातात गन घेतलेलं तिचं बेअरिंग आणि वेशभूषा पाहता एखाद्या खलनायकाची अथवा 'शूटर'ची व्यक्तिरेखा ती साकारताना दिसेल. तिचा ‘शूटर’ अंदाज आगामी ‘एकदा येऊन तर बघा’ या सिनेमातला आहे. या सिनेमात विशाखाने ‘मगरु’ या ‘शार्प शूटर’ ची भूमिका साकारली असून यात ती 'डॅशिंग रावडी लूक' मध्ये दिसणार आहे.
एकाच इमेजमध्ये अडकून पडले नाही : विशाखा सुभेदार
'एकदा येऊन तर बघा' या सिनेमातील भूमिकेबद्दल बोलताना विशाखा सुभेदार म्हणाली,"ही अतिशय भन्नाट व्यक्तिरेखा आहे. ग्रे शेड असलेली भूमिका साकारताना मेकअप, बॉडी लँग्वेज, एक्स्प्रेशन्स या सगळ्यांकडे खास लक्ष द्यावं लागतं. भूमिका कोणत्याही प्रकारची असली, तरी ती चांगली व्हावी यासाठी कलाकारांना कष्ट घ्यावे लागतात. एकाच इमेजमध्ये अडकून पडायचं नसल्याने ही वेगळी भूमिका स्वीकारली".
'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'एकदा येऊन तर बघा'
'एकदा येऊन तर बघा' हा सिनेमा 24 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रसाद खांडेकर यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. प्रसाद या विनोदी अभिनेत्याने या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे.
तगडी स्टारकास्ट असलेला 'एकदा येऊन तर बघा'
'एकदा येऊन तर बघा' या सिनेमात विशाखा सुभेदारसह गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, राजेंद्र शिसातकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
संबंधित बातम्या